काँक्रिटीकरणाच्या ३८० कोटींच्या कामांना ब्रेक; टप्पा- २ मधील ईगल व NCC ची कामे काढून घेणार; नव्या निविदांद्वारे टप्पा- ३ मध्ये समावेश

मुंबईतील सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. टप्पा-दोनमधील कामांमध्ये नियोजनाचा अभाव, अत्यंत संथ गती आणि अपूर्ण कामांमुळे शहर विभागातील ईगल आणि एनसीसी या दोन कंत्राटदारांकडील सुमारे ३८० कोटी रुपयांची कामे काढून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला...
काँक्रिटीकरणाच्या ३८० कोटींच्या कामांना ब्रेक; टप्पा- २ मधील ईगल व NCC ची कामे काढून घेणार; नव्या निविदांद्वारे टप्पा- ३ मध्ये समावेश
काँक्रिटीकरणाच्या ३८० कोटींच्या कामांना ब्रेक; टप्पा- २ मधील ईगल व NCC ची कामे काढून घेणार; नव्या निविदांद्वारे टप्पा- ३ मध्ये समावेशप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबईतील सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. टप्पा-दोनमधील कामांमध्ये नियोजनाचा अभाव, अत्यंत संथ गती आणि अपूर्ण कामांमुळे शहर विभागातील ईगल आणि एनसीसी या दोन कंत्राटदारांकडील सुमारे ३८० कोटी रुपयांची कामे काढून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो मंजुरीसाठी आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ही अपूर्ण कामे आता काँक्रिटीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट करून नव्या निविदांद्वारे इतर कंत्राटदारांना देण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

मुंबईतील ७१२ किलोमीटर लांबीच्या २,१७५ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३२४.९१ किलोमीटर लांबीचे ७३३ रस्ते, तर दुसऱ्या टप्प्यात ३८८ किलोमीटर लांबीचे १,४४२ रस्ते हाती घेण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील ६९४ रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून एकूण प्रगती ८९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत १,२०३ रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून प्रगती ७५ टक्के आहे. तरीही सुमारे २७५ रस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.विशेषतः शहर विभागातील कामांमध्ये मोठा खोळंबा झाला आहे. ईगल आणि एनसीसी या कंपन्यांना शहर विभागातील अनेक रस्त्यांची जबाबदारी देण्यात

आली होती. मात्र अपेक्षित गतीने काम न झाल्याने आणि अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण राहिल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीसी कंपनीकडील सुमारे ३०० कोटी रुपयांची तर ईगल कंपनीकडील सुमारे ८० कोटी रुपयांची कामे काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मे २०२७ पर्यंत सर्व काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील कामांना सर्वाधिक फटका

शहर विभागातील झोन-१ मध्ये ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डांचा समावेश असून कुलाबा, फोर्ट, मरिन लाईन्स, ग्रँट रोड, भायखळा आणि वाळकेश्वर हे प्रमुख परिसर येतात. तर झोन-२ मध्ये एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर आणि जी दक्षिण वॉर्डांचा समावेश असून सायन, माटुंगा, वडाळा, परेल, दादर, माहिम आणि प्रभादेवी हे भाग येतात. याच दोन्ही झोनमधील रस्ते काँक्रिटीकरणाची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळ आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

कंत्राट रद्द करण्यासाठी नार्वेकरांचे बांगर यांना पत्र!

दक्षिण मुंबईतील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबावरून कुलाबा येथील भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी नुकतेच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांना पत्र लिहून एनसीसी लिमिटेडचे कंत्राट तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. गेल्या तीन वर्षांत संबंधित कंपनीने केवळ १५ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा त्यांनी पत्रात केला होता. त्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावित कारवाईला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in