Mumbai : नालेसफाईवर उपायुक्तांची नजर; आयुक्तांच्या आदेशानुसार 'ऑन दी स्पॉट' करणार पाहणी

मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे रविवारपासून सुरू होतील. गाळ काढण्याच्या कामाचे सुयोग्य नियोजन करावे, गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट द्यावी, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
Mumbai : नालेसफाईवर उपायुक्तांची नजर; आयुक्तांच्या आदेशानुसार 'ऑन दी स्पॉट' करणार पाहणी
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्यातून गाळ उपशाची कामे गतीने करण्यात येत आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे रविवारपासून सुरू होतील. गाळ काढण्याच्या कामाचे सुयोग्य नियोजन करावे, गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट द्यावी, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष व अन्य लोकप्रतिनिधींना नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाची नियमित माहिती द्यावी. त्यांच्या समवेत पाहणी दौरे आयोजित करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निश्चित ठिकाणी विल्हेवाट लावावी. आवश्यक त्या १४ ठिकाणी 'ट्रॅश बूम'चा वापर करावा. रेल्वे प्रशासन व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याशी प्रभावी समन्वय साधावा. पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत व अखंड राहील, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामांचा प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि परिमंडळनिहाय शनिवारी आढावा घेतला.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या विभाग) कल्पना राऊळ यांच्यासह सर्व परिमंडळ सह आयुक्त/उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त, पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्यातून गाळ उपशाची कामे गतीने करण्यात येत आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे रविवारपासून सुरू होतील. विहित मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या जाणाऱ्या ट्रॅश बूममुळे कचरा समुद्रात जाण्यापासून रोखला जातो आणि तो सहजपणे गोळा करून विल्हेवाट लावता येते. महानगरपालिकेकडे एकूण १४ ट्रॅश बूम आहेत. आवश्यक त्या ठिकाणी 'ट्रॅश बूम' चा वापर करावा. मोगरा नाला, मजास नाला, मानखुर्द नाला, सोमय्या नाला, वाकोला नाला व दादर-धारावी नाल्याच्या ठिकाणी अधिक प्रभावीपणे कामकाज करावे. याठिकाणी 'ट्रॅश बूम' आणि अन्य यंत्रसामुग्री तैनात करावी.

पर्जन्य जलवाहिन्यांची सुरू असलेली सर्व कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत. रेल्वे प्रशासन, मेट्रो प्रशासन यांच्या समवेत संयुक्त दौरा करावा. रेल्वे / मेट्रो कार्यस्थळी भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे देखील समाविष्ट आहेत. रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबई महानगरात पाणी साचू नये, त्याचा जलद गतीने निचरा व्हावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश गगराणी यांनी दिले.

नालेसफाईची रिअल टाइम माहिती कळणार

नागरिकांना नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाची इत्यंभूत माहिती मिळावी म्हणून महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर छायाचित्रं/चित्रफिती उपलब्ध करून दिल्या आहेत. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील नाल्यांमधून गाळ उपसा कामांचे तपशील पाहता येतात. त्यामुळे नाल्यातून गाळ काढल्यानंतर गाळाची तत्काळ वाहतूक सुरू करावी. जेणेकरून 'डॅशबोर्ड 'वर त्याची माहिती तत्काळ सार्वजनिकरीत्या प्रदर्शित होईल. तसेच, नागरिकांना वास्तविक वेळेत (रिअल टाइम) प्रगती पाहता येईल. डॅशबोर्डची लिंक नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांना उपलब्ध करून द्यावी, असे गगराणी यांनी नमूद केले.

गाळ काढण्यात गैरप्रकार खपवून घेणार नाही

पावसाळा सुरू व्हायला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार गाळ उपशाचे कामकाज सुरू आहे. गाळ काढण्याच्या कामासाठी यावर्षी काही कंत्राटदार संस्थांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडीओंचे महापालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. तसेच नाल्यातून गाळ काढण्याच्या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. प्रसंगी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in