

मुंबई : मुंबई पालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार आहे. वांद्रे पश्चिम येथील के. बी. भाभा रुग्णालयाच्या खुल्या जागेवर सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी वीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
संस्थेला ५ कोटी ५६ लाख रुपयांचे एकरकमी अधिमूल्य आणि प्रतिवर्षी अवघ्या २ हजार ३५० रुपये भाडेपट्ट्याने ही जागा सुरुवातीला दहा वर्षांसाठी देण्यात येणार आहे. ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने जागा देण्यात येणार असून १०० विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे. हे पालिकेचे पहिले बीएस्सी नर्सिंग कॉलेज ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुंबई उपनगराचे पालकमंत्र्यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन के. बी. भाभा रुग्णालयाच्या आवारात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी केली होती.