Mumbai : मनपा सभागृह नेतेपदी प्रभाकर शिंदे, गणेश खणकर यांची वर्णी?
मुंबई : मुंबईचा मनपाच्या सभागृह नेते पदी विरोधकांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर देणारा, प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देणारा नेता पालिका सभागृहात असणे गरजेचे आहे. यासाठी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि गणेश खणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु प्रभाकर शिंदे यांचा अनुभव, अभ्यास लक्षात त्यांच्यावर सभागृह नेते अथवा सर्वांत महत्त्वाची समिती असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागू शकते, असे भाजपच्या नेत्याने सांगितले.
मुंबई निवडणुकीत महापालिकेच्या भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेतील भाजप हा मोठा पक्ष असल्याने या पक्षाच्या महापौर बनल्यास याच पक्षाचा गटनेचा हा सभागृह नेता म्हणून निवडला जाऊ शकतो. त्यामुळे या सभागृह नेते पदासाठी माजी सभागृह नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र प्रभाकर शिंदे यांनी यापूर्वी सभागृह नेतेपद भूषवलेले असल्याने या पदावर पुन्हा त्यांची नेमणूक केली गेल्यास स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला द्यावे यावरून पक्षाची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे प्रवक्ते आणि भाजपचे महामंत्री गणेश खणकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
गणेश खणकर हे यापूर्वी स्वीकृत नगरसेवक होते आणि त्यांनी महापालिकेच्या सभागृहामध्ये सहभाग घेतलेला आहे. सभागृहाचे कामकाज त्यांना प्रचलित आहे. संभाव्य विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या राजकीय टीकेला खणकर चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. त्यामुळे सभागृह नेते पदासाठी गणेश खणकर हे पर्याय ठरू शकतात, असे बोलले जाते.
या पदासाठी प्रभाकर शिंदे हे योग्य उमेदवार असले तरी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी एवढ्या क्षमतेचा नगरसेवक कोण असा प्रश्न पक्षापुढे निर्माण होऊ शकतो. या पदासाठी मकरंद नार्वेकर यांच्याही नावाची चर्चा असली तरी समितीचे कामकाज योग्य दृष्टीने हाताळण्याचा दृष्टिकोनातून तसेच एकाच कुटुंबात अनेक पदे दिली गेली अशा प्रकारची भावना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण होऊ नये यासाठी नार्वेकर यांचे नाव वगळण्याची शक्यता अधिक आहे.

