महापौरपदासाठी भागम् भाग! पडद्यामागे जोरदार हालचाली; शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात?

महायुतीकडे स्पष्ट बहुमत असताना, आता शिवसेना शिंदे गटानेही आपली ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवत अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याचे समजते. ‘देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो,’ असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐनवेळी वाटाण्याच्या अक्षता लावतील, या भीतीने शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे समजते.
महापौरपदासाठी भागम् भाग! पडद्यामागे जोरदार हालचाली; शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात?
Published on

मुंबई : एकीकडे मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने रविवारी भागमभाग सुरू असतानाच, दोन दिवसांपूर्वी निकाल लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीही आता पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असताना, आता शिवसेना शिंदे गटानेही आपली ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवत अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याचे समजते. ‘देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो,’ असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐनवेळी वाटाण्याच्या अक्षता लावतील, या भीतीने शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँड्स एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. सर्व २९ नगरसेवकांना बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हॉटेलमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असल्यामुळे ते परत आल्यानंतरच महापौरपदाचा निर्णय होऊ शकतो. मात्र तोपर्यंत ठाकरे गटानेही शिंदेंच्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव

मुंबई महापालिकेत भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले असले तरी बहुमताचा ११४ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना शिंदे सेनेच्या २९ नगरसेवकांची मदत घ्यावीच लागणार आहे. स्वत:च्या जोरावर भाजप आपला महापौर बसवू शकत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला अडीच वर्षांचे महापौरपद मिळावे, यासाठी भाजपसमोर प्रस्ताव ठेवल्याचे समजते. मात्र शिंदे गटाकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शिंदेंचे नगरसेवक ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत, तिथे जेवायला जाण्याची तयारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

नव्या नगरसेवकांसाठी दोनदिवसीय शिबीर

‘आमचे जवळपास २० नगरसेवक नवखे आहेत. त्यांना महानगरपालिकेचे कामकाज कसे चालते, याबद्दल काही माहिती नाही. त्याचसंदर्भाने आम्ही नगरसेवकांसाठी दोनदिवसीय शिबीर घेतले आहे, त्यासाठी हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. शिवाय हे सगळेजण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना हरवून आलेत. आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करायची गरज नाही. आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. महायुती म्हणूनच आम्ही सत्तेत येणार’, असे स्पष्टीकरण शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिले.

पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत -संजय राऊत

मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये, अशी सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले. काल मी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही भावांमध्ये मोबाईलवरून चर्चाही झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालींकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.

शिंदे-चव्हाण यांच्यात गुप्त बैठक

मुंबई तसेच महानगरांमधील महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेसह उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौरपदाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही -बावनकुळे

मुंबई महानगरपालिकेत अडीच-अडीच वर्षांचा महापौर व्हावा, असा कोणताही प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेकडून आलेला नाही. आमच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे अशी कोणतीही मागणी आलेली नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल, आमच्या महायुतीच्या समन्वयक समितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल. कोणी काय मागणी केली, यावरही चर्चा होईल. तसेच एकनाथ शिंदे यांना काही चर्चा करायची असेल तर ते थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करतील,’ असे भाजपचे नेते बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in