Mumbai : मुख्यालयासमोरच पालिकेचे नवे सभागृह; ३३२ नगरसेवकांची आसनव्यवस्था, ३० कोटींचा खर्च अपेक्षित

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानाच्या गेटजवळ सहा मजली नवे सभागृह उभारण्यात येणार आहे. ३३२ सदस्य क्षमतेचे अत्याधुनिक थिएटर-शैलीतील ‘सभागृहाचा हॉल’ निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार आहे.
Mumbai : मुख्यालयासमोरच पालिकेचे नवे सभागृह; ३३२ नगरसेवकांची आसनव्यवस्था, ३० कोटींचा खर्च अपेक्षित
Mumbai : मुख्यालयासमोरच पालिकेचे नवे सभागृह; ३३२ नगरसेवकांची आसनव्यवस्था, ३० कोटींचा खर्च अपेक्षित'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानाच्या गेटजवळ सहा मजली नवे सभागृह उभारण्यात येणार आहे. ३३२ सदस्य क्षमतेचे अत्याधुनिक थिएटर-शैलीतील ‘सभागृहाचा हॉल’ निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार आहे.

भविष्यात महापालिकेतील लोकप्रतिनिधींची संख्या वाढल्यास त्यानुसार व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी मुंबई महापालिका ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून खर्चात ३ ते ४ कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या पालिका सभागृहात २२७ निवडून आलेले आणि १० नामनिर्देशित अशा एकूण २३७ सदस्यांची व्यवस्था आहे. मात्र भविष्यात प्रभागरचना आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे सदस्यसंख्येत वाढ होण्याची शक्यता गृहित धरून नव्या सभागृहात ३३२ नगरसेवकांसाठी आसनव्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे.

सुमारे ९०० चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या सहा मजली इमारतीत तळमजल्यावर सुमारे ६० वाहनांच्या पार्किंगची सुविधा असेल. पहिला आणि दुसरा मजला पोडियमसाठी राखीव असेल. तिसऱ्या मजल्यावर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी व्यायामशाळा (जिम्नॅशियम) उभारण्यात येणार आहे. चौथ्या मजल्यावर महापौर आणि विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये असतील.

पाचवा आणि सहावा मजला एकत्रित करून अत्याधुनिक थिएटर-शैलीतील कॉर्पोरेशन हॉल तयार करण्यात येणार आहे. या सभागृहात नगरसेवकांसोबतच पत्रकारांसाठी स्वतंत्र मीडिया गॅलरी आणि महापालिका सभांसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने याच जागेवर यापूर्वी ‘टाऊन हॉल’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र विद्यमान सभागृहातील जागेच्या मर्यादा लक्षात घेऊन विशेषतः सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी नवीन सभागृह उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार चार मजली प्रस्तावित इमारतीचे रूपांतर आता सहा मजली इमारतीत करण्यात आले आहे.

दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित

या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर यंदाच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

वारसा संवर्धन समितीची मंजुरी बंधनकारक

ही इमारत ग्रेड-१ वारसा वास्तू असलेल्या पालिका मुख्यालयासमोर उभारली जाणार असल्याने वारसा संवर्धन समितीची मंजुरी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच सध्या या जागेखाली कार्यरत असलेली दुकाने सुरू राहणार असली तरी त्याठिकाणी स्वयंपाक करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशी असेल नवी इमारत!

  • तळमजला : ६० वाहनांसाठी पार्किंग

  • पहिला व दुसरा मजला : पोडियम

  • तिसरा मजला : कर्मचाऱ्यांसाठी जिम्नॅशियम, बॅडमिंटन

  • चौथा मजला : महापौर, उपमहापौर व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये

  • पाचवा व सहावा मजला : ३३२ आसनक्षमतेचे थिएटर-शैलीतील सभागृह व मीडिया गॅलरी

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in