

मुंबई : मुंबईचा महापौर ठरल्यानंतर आता मुंबई महापालिका मुख्यालयातील कार्यालयावरून रस्सीखेच सुरू आहे. पालिका मुख्यालयातील काँग्रेसचे आधीचे कार्यालय शिंदेसेनेला देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्या कार्यालयाचा दरवाजा पश्चिमेला असल्याने वास्तुदोष असल्याचे सांगत शिंदेसेनेने त्या कार्यालयास नकार दिला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या तळमजल्यावर असलेल्या कार्यालयाशेजारीच कार्यालय द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केली आहे. परंतु ठाकरेंच्या कार्यालयातील ३० टक्के जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून काँग्रेसने आपला फलकही दरवाजासमोर आणून ठेवला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन केली. त्यानंतर मुंबई महापालिकेतील ठाकरे सेनेच्या कार्यालयावर शिंदेसेनेने ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता ठाकरे सेना व शिंदेसेनेत शाब्दिक चकमक उडाली. वादावादी मारहाणीपर्यंत पोहोचली आणि माजी आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सगळीच पक्ष कार्यालये सील केली. परंतु आता मुंबई महापालिका मुख्यालयात साडेतीन वर्षांनंतर नगरसेवकांची रेलचेल असणार आहे.
नगरसेवकासाठी कक्ष
नगरसेवक हे जनतेचे सेवक म्हणून मुंबई महापालिकेत निवडून येतात. परंतु दोन नगरसेवक निवडून आले तरी त्यांना पक्ष कार्यालय उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सपचे दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी नगरसेवक कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे.