

मुंबई : एस विभागातील प्रभाग क्रमांक १११ चे ठाकरे सेनेचे नगरसेवक दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत नगरसेवक पदही रद्द करण्यात आल्याचे महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी सभागृहात जाहीर केले. उद्धव सेनेचे खासदार गेले, नगरसेवक सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकापाठोपाठ एक हादरे बसत आहेत. आता एक नगरसेवक कमी झाल्याने मुंबई महापालिकेत ठाकरे सेनेचे संख्याबळ ६५ वरून ६४ वर घसरले आहे.
दरम्यान, सावंत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने भाजपच्या नगरसेविका सारिका पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली असून दुसऱ्या नंबरवर त्या असल्याने नगरसेवक म्हणून त्यांची निवड होऊ शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा आकडा ८० होणार आहे.
७९ नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र बनावट?
मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या २२७ पैकी ७९ नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याच्या आणि इतर कारणांमुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यापैकी एक शिवसेनेचे भांडुप येथील प्रभाग क्रमांक १११ मधून निवडून आलेले शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना नगरसेवक पदाला मुकावे लागले आहे. सहाय्यक निवडणूक आणि नगर शुल्क अधिकारी यांनी १८ जून रोजी महापालिका सचिव यांना दिलेल्या पत्रानुसार भांडुप येथील प्रभाग १११ चे नगरसेवक शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक दीपक राजाराम सावंत यांनी २७ डिसेंबर २०२५ निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी यांनी १५ जून रोजी अवैध ठरवले आहे.
महापौरांकडून नगरसेवक पद रद्द केल्याची घोषणा
त्याबाबतचे पत्र महापालिका सचिव यांना पाठविण्यात आले आहे. त्याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने आणि महापालिका कायदा १८८८ च्या कलम १६/१ क अ अनुसार दीपक राजाराम सावंत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी महापालिका सभागृहात केली.
एवढी घाई का?
दीपक सावंत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. तसेच, सदर प्रकरणी सभागृहात घोषणा करण्याची एवढी घाई का केली जाते, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. तसेच, जात पडताळणीसाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
हे प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पालिकेने घाई करून निर्णय घेऊ नये. तोपर्यंत वाट बघावी, अशी सूचना देखील किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली. यावेळी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी, जात पडताळणी समितीने दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले असून आयुक्तांच्या पत्रात तसा उल्लेख आहे. तसेच, जात पडताळणी समितीच्या निर्णयाला अद्याप कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नसल्याचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
जात प्रमाणपत्र अवैध ठरविले
तसेच, विधी खात्यानेही त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती प्रभाकर शिंदे यांनी यावेळी दिली. भाजपचे नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर आणि स्वीकृत नगरसेवक प्रवीण छेडा यांनीही, नगरसेवक दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले असून त्याबाबतच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती नसल्याचे सांगितले.
समीर पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा
गोवंडी येथील एम-पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३७ मधून ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेले एआयएमआयएमचे नगरसेवक समीर रमजान पटेल यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबतचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. या निर्णयानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची घोषणा मुंबई महापालिकेच्या सभागृहात केली जाणार होती. मात्र, या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या समीर पटेल यांचे सदस्यत्व कायम राहिले असून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.