Mumbai : एक हजार झोपडीधारकांना नोटिसा; १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई अटळ, आकडा वाढणार

मुंबईतील ३९ हजारांहून अधिक झोपड्यांची उंची ही १४ फुट व त्यापेक्षाही अधिक असल्याने या झोपड्यांवर कारवाईचा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे. गोवंडी, मानखुर्द, धारावी या भागांतील तब्बल एक हजार झोपडीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Mumbai : एक हजार झोपडीधारकांना नोटिसा; १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई अटळ, आकडा वाढणार
Mumbai : एक हजार झोपडीधारकांना नोटिसा; १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई अटळ, आकडा वाढणार प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील ३९ हजारांहून अधिक झोपड्यांची उंची ही १४ फुट व त्यापेक्षाही अधिक असल्याने या झोपड्यांवर कारवाईचा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे. गोवंडी, मानखुर्द, धारावी या भागांतील तब्बल एक हजार झोपडीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईत ३९ हजारांहून अधिक झोपड्या १४ फुट व त्यापेक्षाही उंच असून हा आकडा आणखी वाढेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या असून यापैकी ३९ हजार १११ झोपड्यांची उंची १४ फूट व त्यापेक्षाही अधिक आहे. मुंबईत १४ फुट व त्यापेक्षाही उंच झोपड्या किती आहेत, याची माहिती घेण्यास ऑगस्ट २०२४ पासून तत्कालीन आयुक्त अयोज मेहता यांनी सुरुवात केली. त्यानंतर आता ७ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील १४ फुट व त्यापेक्षाही उंच झोपड्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यात ३९ हजारांहून अधिक झोपड्या १४ फुट व त्यापेक्षाही उंच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी एक हजार झोपडीधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अशा झोपड्यांचा आकडा आणखी वाढेल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी मोहीम

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांच्या मार्गदर्शनात, सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने, झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

झोपड्यांवरील कारवाईला स्थगिती द्या : भाजपचीच मागणी

मुंबईतील १४ फुट व त्यापेक्षाही उंच झोपड्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे. ४० टक्के मुंबई ही झोपडपट्टी क्षेत्रामध्ये मोडते. महाराष्ट्र शासनातर्फे ‘एसआरए’ मार्फत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध ठिकाणी क्लस्टर योजनांच्या तसेच, अन्य योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून, युध्द पातळीवर मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून मुंबईकर या झोपड्यांमध्ये रहात असून, मुंबई महानगरपालिकेतर्फे या विषयामध्ये गरीब मुंबईकरांना त्रास होईल असे मुंबई पालिकेकडून कुठलेही पाऊल उचलले जाणे अपेक्षित नसून या संदर्भात जर अशा काही सूचना दिल्या असतील तर त्याला त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तथा सभागृह नेते गणेश खणकर यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

झोपड्यांबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी : रईस शेख

१४ फुटांपेक्षा अधिक उंच झोपडपट्ट्यांविरोधात मुंबई महापालिका कारवाईचा बडगा उगारणार असून, त्यामध्ये ३९ हजार झोपडपट्टीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजप-शिवसेनेने १८ फुटांपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईबाबत भाजप-शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी निर्णयाला स्थगिती द्यावी : वर्षा गायकवाड

बृहन्मुंबई महानगरपालिकेने १४ फुटांवरील झोपडपट्ट्यांमधील निवासी बांधकाम पाडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजप-शिवसेनेने १८ फुटांपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली होती, मग आताच काय झाले की, १४ फुटांवरील बांधकाम तोडण्याचा निर्णय घेतला, हा तुघलकी निर्णय असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in