

मुंबई : रस्त्यावर थुंकलात, कचरा फेकलात, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, विनापरवाना राडारोड्याची वाहतूक करणे यावर आता ३५० हून अधिक ज्युनियर सुपरवायझरचा वॉच असणार आहे. रस्त्यांवर थुंकलात तर २५० रुपये, कचरा फेकलात तर ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असून विनापरवाना राडारोड्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले तर २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या कामासाठी ३५० ज्युनियर सुपरवायझरची नियुक्ती करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई करण्यासाठी पालिकेने क्लिनअप मार्शलची नियुक्ती केली होती. मात्र, मुंबईकर आणि क्लिनअप मार्शल यांच्यात होणारे वाद आणि क्लिनअप मार्शलवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे क्लिनअप मार्शलना पालिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता ज्युनियर सुपरवायझरची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी ३५० उमेदवारांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व २४ वॉर्डमध्ये ज्युनियर सुपरवायझरची नेमणूक करण्यात आली आहे.
न्यूसेंस डिटेक्टरसाठीही प्रयत्न
अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे १०२ न्यूसेंस डिटेक्टरची १०२ पदे आहेत. या पदांबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याबाबत संबंधित कामगार युनियनशीही पालिकेची बोलणी सुरू आहे. त्यामुळे हे न्यूसेंस डिटेक्टरही लवकरच सेवेत येतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी व्यक्त केला.
‘क्लीनअप मार्शल’ना कायमचा दरवाजा बंद
मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांना शिस्त लागावी, या उद्देशाने घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र क्लीनअप मार्शलची दादागिरी, बेकायदा पैसे वसुली याबाबत मुंबई महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अखेर क्लीनअप मार्शलचे कंत्राट रद्द करण्यात आले असून आता मुंबई महापालिकेत क्लीनअप मार्शलसाठी दरवाजा कायमचा बंद करण्यात आला आहे.