मुंबईत अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (दि. ५) वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर शहरात खळबळ उडाली होती. अखेर या धमकीमागील सूत्र पोलिसांनी उलगडली असून, उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एका ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेने अश्विन कुमार सुप्रा (वय ५०) याला अटक केली आहे. हा मूळचा बिहारमधील पाटलीपुत्रचा रहिवासी असून, तो गेल्या पाच वर्षांपासून नोएडामध्ये वास्तव्यास आहे. तो व्यवसायाने ज्योतिषी असून पोलिसांनी त्याचा मोबाईल, सिमकार्डसह इतर डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जात आहे.
मुंबई पोलिसांना मिळालेल्या संदेशात शहरभर ३४ मानवी बॉम्ब पेरल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले असून, ४०० किलो आरडीएक्स वापरून मोठा स्फोट घडवला जाईल, असा उल्लेख होता. 'लष्कर-ए-जिहादी' या संघटनेच्या नावाने हा संदेश पाठवण्यात आला होता.
ही धमकी गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आल्याने तातडीने मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली.
मित्राशी जुन्या वादाचा बदला
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अश्विनने आपल्या जुन्या मित्राला फिरोजला फसवण्यासाठी ही खोटी धमकी दिली. २०२३ मध्ये पटण्यातील फुलवारी शरीफ येथे दाखल झालेल्या प्रकरणात फिरोजमुळे अश्विनीला तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने फिरोजच्या नावाने मुंबई पोलिसांना खोटा संदेश पाठवला.
अश्विनच्या ताब्यातून ७ मोबाईल फोन, ३ सिमकार्ड, ६ मेमरी कार्ड होल्डर, २ डिजिटल कार्ड, १ सिम स्लॉट एक्सटर्नल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.