

मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर तत्काळ बंदी घालणे योग्य नाही. हजारो मूर्तिकारांचा रोजगार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हित राखणारे धोरण स्वीकारावे, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिका आयुक्त व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांना लिहिल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव समन्वय समितीने पर्यावरण संरक्षणासह गणेशोत्सवाची परंपरा, सार्वजनिक गणेश मंडळांचे हित आणि हजारो मूर्तिकारांचा रोजगार यांचा समतोल राखणारे धोरण स्वीकारण्याची मागणी २ जून रोजी महापालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांच्याकडे केली आहे.
पर्यावरण संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून त्याबाबत कोणतीही तडजोड होऊ नये. परंतु पीओपी मूर्तीवर तत्काळ बंदी घालण्याऐवजी विसर्जनानंतर मूर्तीची १०० टक्के पुनर्प्राप्ती, वैज्ञानिक विघटन आणि पुनर्प्रक्रिया यावर आधारित शाश्वत व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे अधिक व्यवहार्य आणि परिणामकारक ठरेल, असेही दहिबावकर म्हणाले.
गणेशोत्सव समन्वय समितीचे असे मत आहे की, गणेशोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि गणेशोत्सव परंपरा यांचा समन्वय साधणारे धोरण राबविणे आवश्यक आहे.
सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार, गणेशभक्त आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांना या विषयावर सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.
नवीन नियमांचा विचार सुरू
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण वॉर्ड तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून पीओपी गणेशमूर्तीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम व मार्गदर्शक तत्त्वांचा विचार सुरू असल्याचे समजते.
समितीने ‘या’ मुद्द्यांकडे लक्ष वेधले
पीओपी मूर्तीवर तत्काळ बंदी लागू करू नये
विसर्जनानंतर पीओपी अवशेषांचे १०० टक्के संकलन व पुनर्प्रक्रिया करावी
प्रत्येक विभागात स्वतंत्र संकलन व पुनर्प्रक्रिया केंद्रे स्थापन करावीत
मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र व व्यवहार्य धोरण निश्चित करावे
मूर्तिकार, गणेश मंडळे, पर्यावरण तज्ज्ञ आणि प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी
कोणतेही नवीन नियम लागू करण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा करावी
पर्यायी व्यवस्थेसाठी किमान ३ ते ५ वर्षांचा संक्रमण कालावधी द्यावा