

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी दैनंदिन कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन व्यवस्था ही त्रिसूत्री अधिक बळकट करण्यास प्राधान्य देण्यात यावे. दाटीवाटीची वस्ती, झोपडपट्टी या ठिकाणी कचरा संकलनाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी सूक्ष्म नियोजन करा, कचरा टाकणाऱ्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्हीची नजर ठेवा, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारा, रस्त्याच्या दुतर्फा बेवारस वाहने हटवा, असे सक्त निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पालिकेच्या संबंधित विभागाला दिले. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी वडाळा, चेंबूर चुनाभट्टी या ठिकाणी सरप्राइज व्हिझीट करत स्वच्छतेच्या कामाची झाडाझडती घेतली.
स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी स्वच्छतेत नवनवे प्रयोग करण्यासाठी नागरिक संघ, सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्थांचे मार्गदर्शन घ्या तसेच टीआयएसएससारख्या संस्थांचे मार्गदर्शन घ्या. त्यांचे अभ्यासगट करून मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. यावेळी उपायुक्त प्रशांत सपकाळे, प्रशांत गायकवाड, किरण दिघावकर, संध्या नांदेडकर, साहाय्यक आयुक्त अरुण क्षीरसागर, शंकर भोसले, धनाजी हेर्लेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापालिका कर्मचाऱ्यांशी संवाद
पाहणी दरम्यान त्यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. दररोज स्वच्छता वाहनांच्या किती फेऱ्या होतात, कचऱ्याचे वर्गीकरण-वहन कोणत्या पद्धतीने केले जाते, कोणत्या भागांत अधिक कचरा निर्माण होतो, अशा विषयांची सविस्तर माहिती जाणून घेतली. घराघरांतून संकलित होणारा कचरा आणि त्याच्या वाहतुकीचे प्रभावी नियोजन करा. विविध संकुलांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्वतंत्र नियोजन करणे तसेच ‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्वच्छता अभियान अधिक परिणामकारकपणे राबवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
वॉर्ड मॅप तयार करा!
ज्या ठिकाणी कचरा अधिक संकलन होते, त्या वॉर्डमध्ये प्रत्येक रस्त्यांवरील कचरा संकलनाचा आराखडा तयार करून नेमलेल्या संस्थांकडून गोळा केलेल्या कचऱ्याची नोंद घ्यावी, त्याचा अभ्यास करून मॉडेल विकसित करण्याच्या सूचना भिडे यांनी दिल्या.