'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील चौकशी कक्षात मराठी भाषेवरून प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "नहीं बोलूंगा मराठी" असे कर्मचारी म्हणत असल्याचे व्हिडीओत ऐकू येत असून या घटनेमुळे मराठी भाषेच्या वापराबाबतचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल
Published on

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील चौकशी कक्षातील एका कर्मचाऱ्याने मराठीत बोलण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. व्हिडीओमध्ये एक प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्यात मराठी भाषेवरून शाब्दिक वाद झाल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संबंधित प्रवासी कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याची मागणी करताना दिसतो. त्यावर कर्मचारी "नहीं बोलूंगा मराठी" असे वारंवार म्हणत असल्याचे व्हिडीओत ऐकू येते. याचदरम्यान तो व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला काऊंटरपासून बाजूला हो असेही सुनावताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओ पाहा

हा प्रकार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर घडल्याचा दावा करण्यात येत असून, या व्हिडीओमुळे महाराष्ट्रातील सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेच्या वापराबाबतचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. "सरकारी कर्मचारी अनेकदा अशाच पद्धतीने दादागिरीची भाषा करतात. महाराष्ट्रात उद्घोषक म्हणून काम करत असताना त्याने मराठीत बोलायलाच हवे. येथे बहुसंख्य प्रवासी मराठी भाषिक आहेत, त्यामुळे घोषणांसह संवादही मराठीत व्हायला हवा," अशा शब्दांत एका युजरने 'एक्स'वर संताप व्यक्त केलाय.

रेल्वे प्रशासनाचे मौन

दरम्यान, हा व्हिडिओ खरा आहे की नाही आणि वाद नेमका कधी घडला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, या प्रकरणावर रेल्वे प्रशासनाकडूनही अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे या घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय होती, याबाबत उत्सुकता कायम आहे.

logo
marathi.freepressjournal.in