Mumbai : हार्बरवर एसी लोकलचं पुनरागमन! २६ जानेवारीपासून सेवा पुन्हा सुरू; १४ फेऱ्यांचं संपूर्ण वेळापत्रक बघा एकाच क्लिकवर

सुधारित वेळापत्रक आणि नियोजनामुळे यावेळी एसी लोकल सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. एसी लोकल सेवा प्रामुख्याने सोमवार ते शनिवार या कालावधीत धावतील. मात्र, रविवार आणि घोषित सुट्ट्यांच्या दिवशी याच फेऱ्या नॉन-एसी लोकल्स म्हणून चालवण्यात येतील.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारीपासून हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार असून एसी लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. मध्य रेल्वे (सीआर) कडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल दरम्यान १४ वातानुकूलित (एसी) लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. या नव्या एसी लोकल्समुळे हार्बर मार्गावरील प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.

एसी लोकलचे पुनरागमन

मध्य रेल्वेने १ डिसेंबर २०२१ रोजी हार्बर मार्गावर प्रथम एसी लोकल सुरू केल्या होत्या, परंतु प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे नंतर त्या बंद केल्या. मात्र, यावेळी गर्दीच्या वेळेतही एसी लोकल धावणार असल्याने ही सेवा ऑफिसला जाणाऱ्या कर्माचाऱ्यांसाठी, विशेषतः नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. सुधारित वेळापत्रक आणि नियोजनामुळे यावेळी एसी लोकल सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना महामारीनंतर बहुतांश प्रवासी आरामदायी प्रवासासाठी अतिरिक्त पैसे देण्यास तयार असल्याने प्रवाशांच्या बदललेल्या वर्तनाची चाचणी म्हणूनही हार्बर मार्गाच्या एसी लोकल पुनरागमनाकडे पाहिले जात आहे.

सोमवार ते शनिवार धावणार एसी लोकल

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, या १४ एसी लोकल सेवा सध्या धावणाऱ्या काही नॉन-एसी लोकल्सच्या जागी सुरू केल्या जाणार आहेत. या सेवांमध्ये सात ‘अप’ (CSMT आणि वडाळा रोडकडे जाणाऱ्या) आणि सात ‘डाऊन’ (पनवेल आणि वाशी दिशेने जाणाऱ्या) लोकल्सचा समावेश आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या एसी लोकल सेवा प्रामुख्याने सोमवार ते शनिवार या कालावधीत धावतील. मात्र, रविवार आणि घोषित सुट्ट्यांच्या दिवशी याच फेऱ्या नॉन-एसी लोकल्स म्हणून चालवण्यात येतील. या निर्णयामुळे मध्य रेल्वेवरील एकूण एसी लोकल्सची संख्या ९४ वर जाणार आहे. मात्र, एकूण उपनगरी लोकल फेऱ्यांची संख्या १,८२० इतकीच कायम राहणार आहे.

UP मार्ग (पनवेल / वाशी → CSMT / वडाळा रोड)

  • वाशी → वडाळा रोड
    ▪ सकाळी ४.१५ वाजता सुटणार, ४.४६ वाजता पोहोचणार

  • पनवेल → CSMT
    ▪ सकाळी ६.१७ वाजता सुटणार, ७.३६ वाजता पोहोचणार
    ▪ सकाळी ९.०९ वाजता सुटणार, १०.३० वाजता पोहोचणार (पीक अवर)
    ▪ दुपारी २.३१ वाजता सुटणार, ३.५० वाजता पोहोचणार
    ▪ संध्याकाळी ६.३७ वाजता सुटणार, ७.५६ वाजता पोहोचणार

  • पनवेल → वडाळा रोड
    ▪ दुपारी १२.०३ वाजता सुटणार, १.०४ वाजता पोहोचणार

  • वाशी → वडाळा रोड
    ▪ संध्याकाळी ४.५५ वाजता सुटणार, ५.२६ वाजता पोहोचणार

DOWN मार्ग (CSMT / वडाळा रोड → पनवेल / वाशी)

  • वडाळा रोड → पनवेल
    ▪ सकाळी ५.०६ वाजता सुटणार, ६.०८ वाजता पोहोचणार
    ▪ दुपारी १.१७ वाजता सुटणार, २.२० वाजता पोहोचणार
    ▪ संध्याकाळी ५.३० वाजता सुटणार, ६.३२ वाजता पोहोचणार (पीक अवर)

  • CSMT → पनवेल
    ▪ सकाळी ७.४० वाजता सुटणार, ९.०० वाजता पोहोचणार
    ▪ सकाळी १०.३४ वाजता सुटणार, ११.५४ वाजता पोहोचणार
    ▪ रात्री ८.०० वाजता सुटणार, ९.२१ वाजता पोहोचणार (पीक अवर)

  • CSMT → वाशी
    ▪ दुपारी ३.५४ वाजता सुटणार, ४.४३ वाजता पोहोचणार

महत्त्वाची माहिती

-एसी लोकल सेवा सोमवार ते शनिवार चालू राहतील

-रविवार व सुट्टीच्या दिवशी या गाड्या नॉन-एसी असतील

-वेळापत्रकात बदल झाल्यास मध्य रेल्वेच्या अधिकृत सूचनांनुसार अंमलबजावणी केली जाईल

logo
marathi.freepressjournal.in