भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारीचा संपूर्ण आढावा मंगळवारी (दि.२) घेतला.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा, सुविधा आणि अन्य आवश्यक गोष्टींवर या बैठकीत भर देण्यात आला.
आंबेडकरांनी समाजाला जागरूक केले - मुख्यमंत्री फडणवीस
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले आणि जागरूक केले. या जागरूकतेला अधिक बळकट करण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण करुया", असे आवाहन बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा
चैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावे. अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचनाफलक लावावेत. तसेच, नागरिकांना सुलभ प्रवासासाठी बेस्टतर्फे अतिरिक्त बससेवा उपलब्ध ठेवावी, अशा सूचना या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अनुयायांची व्यवस्था, सुरक्षेची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बस सेवा, भोजन व्यवस्था, चैत्यभूमी परिसरात वॉटरप्रूफ मंडप, स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, पुष्पवृष्टी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सर्व सोयीसुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अनुयायांची सुरक्षा महत्त्वाची
चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध तयारींचा व्यापक आढावा घेतला. यामध्ये सीसीटीव्ही देखरेख, पोलीस बंदोबस्त, वाहतूक योजना, वॉटरप्रूफ तंबू, अन्नछावण्या, आरोग्य सुविधा आणि २४x७ नियंत्रण कक्ष यांचा समावेश आहे. लाखोंची गर्दी अपेक्षित असल्याने अनुयायांची सुरक्षा ही प्रशासनासाठी प्राधान्याची बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोस्टरचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण तसेच माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच इंदू मिल परिसरात प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत आलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती काम पाहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचं एक निमित्त
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले की, "मुंबईत होणाऱ्या या सर्वात मोठ्या वार्षिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी या निमित्ताचा उपयोग करावा."