

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईवर आलेले CNG संकट टळले आहे. बिघाड झालेली CNG गॅस पाईपलाईन दुरुस्त झाली असून गॅस पुरवठा पूर्ववत झाला आहे. अखेर दोन दिवसांनी हा पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF) कंपाऊंडमधील GAIL च्या मुख्य गॅस पाईपलाइनमध्ये बिघाड झाल्याने सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला. या बिघाडामुळे वडाळा येथील MGL सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा प्रभावित झाला आणि त्याचे परिणाम संपूर्ण महानगर प्रदेशात दिसू लागले. रविवारी (दि. १६) दुपारपासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल पंपांवर सीएनजी गॅसचा तुटवडा सुरू झाला.
त्यामुळे वाहतुकीस मोठा फटका बसला होता. यामुळे रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने आणि काही बसेस यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. प्रवाशांच्याही लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रविवारी शाळा-ऑफिस बंद असल्याने त्याचा प्रभाव जास्त जाणवला नाही. मात्र, सोमवार सकाळपासून CNG गॅसवरील वाहने अधिकतर बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. ही समस्या आज संध्याकाळपर्यंत कायम होती. पण, आता हा पुरवठा पुन्हा सुरू झाल्याने वाहतूक समस्याही टळली आहे.