Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

BMW ने बॅरियरला नेमकी कशी धडक दिली, त्यावेळी कारचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याचा तपास सध्या सुरू आहे.
Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद
Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद(X व्हिडीओतून घेतलेले स्क्रीनशाॅट्स)
Published on

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. मरीन ड्राइव्हहून हाजी अलीच्या दिशेने जाणारी भरधाव BMW कार लाला कॉलेज आणि लोटस जेट्टीजवळ बॅरियरला धडकून पुलावरून खाली कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, BMW बॅरियरला धडकून पुलावरून कोसळतानाचा थरारक प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज समोर आले आहे.

भरधाव BMW बॅरियरला धडकली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे ५ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. DD-01-C-6302 क्रमांकाची काळ्या रंगाची BMW कार मरीन ड्राइव्हच्या दिशेने हाजी अलीकडे जात होती. लाला लजपत राय कॉलेज आणि लोटस जेट्टीजवळ कोस्टल रोडच्या उत्तर दिशेच्या मार्गावर ही कार आली असता नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरियरला जोरदार धडकली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला.

CCTV फुटेजमध्ये कार भरधाव वेगाने जाताना दिसत आहे. काही क्षणांतच कार बॅरियरला धडकते आणि धडकेच्या जोरामुळे हवेत उडते. त्यानंतर BMW अनेक वेळा उलटत पुलाखाली सुरू असलेल्या पार्किंगच्या कामाच्या परिसरात जाऊन कोसळते. अपघाताचा हा संपूर्ण प्रकार पाहता परिसरात एकच खळबळ उडाली.

तिघांचा मृत्यू, एक जण जखमी

या अपघाताची माहिती मिळताच ताडदेव पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. मृतांमध्ये धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकसानिया (१९) आणि शनय गज्जर (२१) यांचा समावेश आहे. तर आदित्य कल्पेश्वर ओसवाल (२३) हा या अपघातात जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. BMW ने बॅरियरला नेमकी कशी धडक दिली, त्यावेळी कारचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याचा तपास सध्या सुरू आहे.

CCTV फुटेज पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे ठरणार आहे. या फुटेजच्या आधारे अपघाताच्या आधी कारची हालचाल आणि बॅरियरला धडकण्यापूर्वी नेमके काय घडले, याचा तपास केला जात आहे. ताडदेव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in