

मुंबई : वाहतूककोंडीवर उतारा म्हणून उत्तर सागरीकिनारा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून गोरेगाव-पश्चिम येथील डोंगराळ परिसरातील १४ हजार ३४९.१४ चौरस मीटर जमीन संपादन करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ६७ कोटी रुपये मोजणार आहे.
पालिकेच्या प्रमुख अभियंता (विकास नियोजन) विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, ‘पी-दक्षिण’ विभागातील न.भू.क्र. १६१ (भाग) तसेच मालमत्ता पत्रकातील १अ/१५७, मौजे पहाडी गोरेगाव-पश्चिम येथील सुमारे १४,३४९.१४ चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन सागरीकिनारा रस्त्यामुळे बाधित होत आहे. मंजूर पुनर्रचित विकास आराखडा २०३४ आणि नगरविकास विभागाच्या ८ जून २०२६ च्या अधिसूचनेनुसार हा भूभाग कोस्टल रोडसाठी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही जमीन नैसर्गिक क्षेत्र म्हणून दर्शविण्यात आली असून तिचा काही भाग सीआरझेड-१ क्षेत्रात तसेच ‘हॅझार्ड लाइन’ने बाधित आहे. भूखंडावर सध्या कांदळवन आणि खाडीसदृश भूभाग असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.
मालमत्ता पत्रकानुसार संबंधित २५,७५२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीची मालकी मे. लक्ष्मी ॲसबेस्टॉस प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीकडे आहे. पालिकेने यापूर्वी हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देऊन जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मालकाला दिला होता. मात्र जमीन मालकाने तो प्रस्ताव नाकारून भूसंपादनाद्वारे मोबदला देण्याची मागणी केली असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.
रेडीरेकनर दर, सीआरझेड आणि नैसर्गिक क्षेत्रासंदर्भातील मुद्रांक शुल्क मार्गदर्शक तत्त्वांनुसार जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रतिचौरस मीटर अंदाजे १७,९१७ रुपये दर गृहित धरून संपादन खर्च सुमारे २५७ कोटी रुपये येत असला, तरी पालिकेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात अंदाजित भूसंपादन खर्च सुमारे ६७ कोटी रुपये तसेच पुनर्वसन व पुनर्स्थापना खर्च नमूद करण्यात आला आहे.