

मुंबई : वांद्रे-वरळी सागरी सेतू ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या सागरीकिनारा मार्गालगत विकसित होणाऱ्या ५३ हेक्टर हरितक्षेत्राच्या आराखड्याला ब्रिच कँडी रेसिडेंट फोरमने आक्षेप घेतला आहे. या हरितक्षेत्रासाठी प्रस्तावित सहा प्रवेश-निर्गमन (एन्ट्री-एक्सिट) मार्गांपैकी तीन मार्ग ब्रिच कँडी परिसरालगत ठेवण्यात आल्याने वाहतूककोंडी, पार्किंगची समस्या, तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात ‘ब्रिच कँडी रेसिडेंट फोरम’ने महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून आराखड्यात बदल करण्याची मागणी केली आहे. फोरमच्या मते, प्रस्तावित हरितक्षेत्र सुरू झाल्यानंतर विशेषतः शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रिच कँडी परिसरातील विद्यमान वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
हरितक्षेत्र विकासासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या निधीवरील ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून रिलायन्स फाऊंडेशनने या प्रकल्पात सहभाग दर्शविला आहे.
कोस्टल रोड मार्गावरील प्रस्तावित हरितक्षेत्रामध्ये प्रियदर्शनी पार्कपासून वरळीपर्यंत निसर्ग उद्याने, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक स्थळे, कार्यक्रमांसाठी जागा, मुलांसाठी आकर्षणे, सायकलिंग ट्रॅक, पदपथ आणि विविध उद्यानांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र सहापैकी तीन प्रवेश-निर्गमन मार्ग ब्रिच कँडी परिसरात असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
५३ हेक्टर क्षेत्रावर हरितक्षेत्राचा विकास
सागरीकिनारा मार्ग हा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत सुमारे १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना एकूण ५३ हेक्टर क्षेत्रावर विस्तृत हरितक्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने आराखडा तयार केला असून त्याला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे.