

मुंबई : कोस्टल रोडवर रविवारी (दि. १९) भरधाव पोर्शे कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर धडकली. या अपघातात गाडीच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. मात्र, एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालकाचा जीव थोडक्यात बचावला असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये डिव्हायडरवर जोरदार धडक दिल्यानंतर पोर्शे कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कार रस्त्यावरून हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघाताचे नेमके कारण काय, याचा पोलिसांकडून तपास सुरू असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
आठवडाभरातील दुसरी घटना
गेल्या आठवड्यात कोस्टल रोडवर घडलेली ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी बुधवारी (दि. १५) हाजी अली ते वरळी मार्गावरील कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला अचानक आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट
बोगद्यात कारला आग लागल्यानंतर काही काळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. अनेक वाहनचालकांनी आपली वाहने सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली आणि वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.