रिया चक्रवर्तीला दिलासा; बँक खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश

अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) आवश्यक कायदेशीर प्रक्रिया ‘एनसीबी’ने पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत मुंबईतील विशेष न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाचे बँक खाते पुन्हा सुरू करण्याचे (डिफ्रीजिंग) आदेश दिले आहेत.
रिया चक्रवर्तीचे बँक खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश
रिया चक्रवर्तीचे बँक खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश(संग्रहित फोटो)
Published on

मुंबई : अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) आवश्यक कायदेशीर प्रक्रिया ‘एनसीबी’ने पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत मुंबईतील विशेष न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाचे बँक खाते पुन्हा सुरू करण्याचे (डिफ्रीजिंग) आदेश दिले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित अमली पदार्थ प्रकरणाचा तपास करताना अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) ही खाती गोठवली होती.

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्या वतीने वकील अयाज खान यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. 'एनडीपीएस' कायद्याच्या कलम ६८ एफ अंतर्गत मालमत्ता जप्त किंवा गोठवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनिवार्य नियमांचे पालन करण्यात ‘एनसीबी’ अपयशी ठरल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दुसरीकडे, रिया ही अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या संपर्कात असून ती या सिंडिकेटची सक्रिय सदस्य असल्याचा दावा करत सरकारी पक्षाने या अर्जाला विरोध केला. तपास अधिकाऱ्याने केलेली ही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष 'एनडीपीएस' न्यायालय न्यायाधीश यू. सी. देशमुख यांनी शनिवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. 'एनडीपीएस' कायद्याच्या कलम ६८ एफ (२) नुसार, मालमत्ता जप्त करण्याचा किंवा गोठवण्याचा कोणताही आदेश ३० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकरणाने मंजूर करणे आवश्यक असते. जर अशी मंजुरी मिळाली नाही, तर तो आदेश कायदेशीररीत्या अवैध ठरतो. ‘एनसीबी’ने या अनिवार्य तरतुदीचे पालन केले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

रिया चक्रवर्तीचे बँक खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश
खरातप्रकरणी ६३ कोटींचे संशयास्पद व्यवहार उघड; ED कडून ४२ लाखांची रोकड जप्त; नोटाबंदीच्या काळातील व्यवहारांचा तपास सुरू

उच्च न्यायालयाचे निर्देश आणि कायद्यातील तरतुदी लक्षात घेता रियाचा अर्ज मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले. विशेष न्यायालयाने तत्काळ बँक खाती सुरू करण्याचे निर्देश दिले असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार ही खाती वापरण्यास दोघांना परवानगी दिली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. या घटनेनंतर 'एनसीबी'कडून बॉलिवूड आणि टेलिव्हिजन उद्योगातील अमली पदार्थांच्या कथित वापराबाबत तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in