मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे आज (दि. ६) संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन सुरू केले. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. जवळपास १ तास लोकल सेवा थांबल्याने सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसला. मुंब्रा स्थानकाजवळ जून महिन्यात घडलेल्या रेल्वे अपघात प्रकरणात दोन रेल्वे अभियंत्यांवर दाखल केलेल्या FIR विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
नेमके प्रकरण काय?
९ जून २०२५ रोजी मुंब्रा स्टेशनजवळ एक भीषण अपघात घडला. दोन लोकल एकमेकांच्या जवळून जात असताना दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांची एकमेकांना धडक झाली आणि ते रुळांवर पडले. या दुर्घटनेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांनी या घटनेतील एक ट्रॅक चार दिवसांपूर्वी बदलला होता, परंतु तो वेल्डिंगशिवाय ठेवला होता. ज्यामुळे ही दुर्घटना घडली असे कारण समोर आले. यामुळे जीआरपीने रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल केले.
रेल्वे कर्मचाऱ्यांचा संताप
रेल्वे युनियनचा आरोप आहे की, अभियंत्यांना बळीचा बकरा बनवले जात आहे. अपघात ही व्यवस्थात्मक समस्या असून जबाबदारी फक्त दोन व्यक्तींवर टाकता येत नाही. यामुळे युनियनने आज संध्याकाळी CSMT येथे अचानक आंदोलन पुकारले. मोटरमन आणि इतर कर्मचाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतल्याने, ०५.४० पासून लोकल सेवा पूर्णपणे थांबली. फलाटावर प्रचंड गर्दी उसळली. प्रवाशांमध्ये रोष आणि गोंधळ निर्माण झाला.
वाहतूक आता सुरु, पण विलंब कायम
रेल्वे प्रशासन आणि युनियनमध्ये चर्चा झाल्यानंतर लोकल सेवा ०६.४० पासून टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. तथापि, गाड्या ४० ते ४५ मिनिटे उशिराने सुरू झाल्याने प्लॅटफॉर्मवर अजूनही गर्दी आहे. रेल्वे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी सांगितले की आंदोलन थांबवण्यात आले आहे. मात्र वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागेल.