

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने शनिवारी (दि. १४) रात्री सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास ११२ या आपत्कालीन हेल्पलाइनवर पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (BDDS) मदतीने संपूर्ण स्थानकाची तपासणी केली. रात्री साडेनऊच्या सुमारास ही शोधमोहीम पूर्ण झाली. मात्र, या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ आढळून आला नाही.
धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने फोन करून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने वापरलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी मुख्य नियंत्रण कक्षाला दिली असून, धमकीचा फोन नेमका कोणी केला, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
मध्य रेल्वेकडून सुरक्षा व्यवस्था वाढवली
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील डी. निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि राज्य पोलिसांनी सीएसएमटी स्थानकावरील सर्व १८ प्लॅटफॉर्मवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. प्रवाशांची तसेच त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. संभाव्य स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू शोधण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले. धमकी मिळाल्यापासून ही तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण, ठाण्यासह प्रमुख स्थानकांवरही बंदोबस्त
सीएसएमटीवरील धमकीनंतर रविवारी (दि. १५) सकाळपासून लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), कल्याण, ठाणे यांसह मुंबईतील इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. धमकीचा फोन कुठून आला आणि तो कोणी केला, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निला यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांनाही यापूर्वी धमक्या
याच आठवड्यात मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला, मुंबई महापौरांचे कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी रेसकोर्स, तसेच शहरातील काही बँका आणि न्यायालयांना लक्ष्य करण्यात आले होते.
या धमक्यांनंतर संबंधित ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली होती. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासणी केली होती. मात्र, या ठिकाणीही कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नव्हती. या प्रकरणांचाही तपास सुरू आहे.