मुंबई : 'गॅस मीटर रीडिंग अपडेट करा' असा फोन किंवा मेसेज आला तर सावध राहा. कांदिवलीतील दोन नागरिकांना 'महानगर गॅस'चे अधिकारी असल्याचे भासवून बनावट एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. फाइल इन्स्टॉल होताच आरोपींनी त्यांच्या मोबाइलचा ताबा मिळवत बँक खात्यांतून लाखो रुपये लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदिवली पोलिसांनी या प्रकरणात गुजरातमधील सुरत जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक केली आहे.
गॅस मीटर रीडिंगच्या नावाखाली APK पाठवली
पोलिसांच्या माहितीनुसार, बकुल कांतिलाल देसाई यांच्याशी अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. गॅस मीटरचे रीडिंग अपलोड करायचे असल्याचे सांगून त्यांना महानगर गॅसच्या नावाने एक एपीके फाइल पाठवण्यात आली. देसाई यांनी ही फाइल मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानंतर आरोपींना त्यांच्या फोनचा प्रवेश मिळाल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून सुमारे २.७० लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
‘फक्त १२ रुपये भरा’ म्हणत दुसऱ्यालाही गंडा
अशाच पद्धतीने शैलेश जयकिशन परमार यांचीही फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले. ७ मे २०२५ रोजी त्यांना गॅस मीटर रीडिंगसाठी केवळ १२ रुपये भरायचे आहेत, असे सांगण्यात आले. त्यानंतर महानगर गॅसच्या नावाने पाठवलेली एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. फाइल इन्स्टॉल केल्यानंतर त्यांच्या मोबाइलचा ताबा मिळवत बचत खात्यातून ४.१७ लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे पोलिसांनी सांगितले.
फसवणुकीच्या पैशांतून गोल्ड लोन फेडल्याचा संशय
दोन्ही प्रकरणांतील आर्थिक व्यवहारांचा माग काढताना पोलिसांना आरोपींनी बजाज फिनसर्व्हकडून गोल्ड लोन घेतल्याचे समोर आले. फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा वापर गोल्ड लोन फेडण्यासाठी आणि तारण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवण्यासाठी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
आर्थिक व्यवहारांच्या आधारे कांदिवली पोलिसांचे पथक गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील ओलपाड येथे पोहोचले. तेथून उर्विशकुमार राजेशभाई पटेल, जानीकुमार प्रदीपभाई पटेल आणि अंकितकुमार संजयभाई पटेल यांना अटक करण्यात आली. या आरोपींनी अशाच पद्धतीने आणखी नागरिकांची फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू आहे.
अशी फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
अनोळखी APK फाइल डाउनलोड करू नका :
व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोनवरून आलेली एपीके फाइल कोणत्याही परिस्थितीत डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका. गॅस, वीज किंवा इतर कंपनीच्या नावाने फाइल आली तरी आधी तिची खात्री करा.
अधिकृत माध्यमातूनच माहिती तपासा :
गॅस मीटर रीडिंग, बिल किंवा कनेक्शनशी संबंधित फोन आल्यास संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ग्राहक सेवा क्रमांकावरून माहितीची पडताळणी करा.
'फक्त काही रुपये भरा' म्हटलं तरी सावध राहा :
१०, १२ किंवा काही रुपयांची छोटी रक्कम मागून एपीके डाउनलोड करण्यास सांगितले तरी त्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
ओटीपी आणि बँकिंग माहिती देऊ नका :
ओटीपी, यूपीआय पिन, एटीएम पिन किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही सांगू नका. अनोळखी व्यक्ती सांगत असेल तर मोबाइलची स्क्रीन शेअरही करू नका.
फसवणूक झाल्यास लगेच तक्रार करा :
खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच बँकेशी संपर्क साधा आणि १९३० या सायबर क्राइम हेल्पलाइनवर तक्रार करा. सायबरक्राइम डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवरही तक्रार नोंदवता येते.