
अखेर मुंबईकरांना नवरात्रोत्सवाचा खरा उत्साह अनुभवता येणार आहे. गरबा आणि दांडिया प्रेमींसाठी मोठा दिलासा देत मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्सवाच्या शेवटच्या ३ दिवसांसाठी लाऊडस्पीकर वापरास विशेष परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दांडिया-गरब्याचा आनंद घेता येणार आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने लाऊडस्पीकर वापराची वेळ रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित ठेवली होती. त्यामुळे रात्रभर सुरू राहणाऱ्या गरबा-दांडिया महोत्सवाला आळा बसला होता. मात्र, नव्या आदेशामुळे आयोजक आणि सहभागी यांना दिलासा मिळाला आहे. उपनगरीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जारी केलेल्या परिपत्रकात सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
कडक अटींसह परवानगी
या परवानगीसोबत काही अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. आयोजकांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमावली तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. विशेषतः रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये अशा शांतता क्षेत्रांमध्ये ही मुदतवाढ लागू होणार नाही.
याशिवाय, ध्वनी प्रदूषण नियमानुसार कार्यवाही बंधनकारक आहे. नियमभंग झाल्यास पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत कठोर दंडात्मक कारवाई होणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पावसाने फिका झालेला उत्सव पुन्हा रंगणार
सततच्या पावसामुळे आणि निर्बंधांमुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसांत अनेक कार्यक्रमांना ग्रहण लागले होते. मात्र, नव्या परवानगीमुळे अंतिम दिवसांमध्ये उत्सवाची रंगत वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातील अनेक खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात मंडळे आणि सांस्कृतिक गटांची गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाच्या अडथळ्यांनंतरही मुंबईकरांनी नव्या जोमाने देवीच्या आराधनेसोबतच सांस्कृतिक जल्लोषाचा आस्वाद घेण्याची तयारी केली आहे.