Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश

भेंडी बाजार येथील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना इमारतीचे उर्वरित पाडकाम उच्च न्यायालयाने तात्पुरते थांबवले आहे.
Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश
Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेशPhoto - Vijay Gohil
Published on: 

मुंबई : भेंडी बाजार येथील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना इमारतीचे उर्वरित पाडकाम उच्च न्यायालयाने तात्पुरते थांबवले आहे. न्यायालयाने गुरुवारी सर्व संबंधित पक्षकारांना २५ नोव्हेंबरपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला अर्ध्यावर धक्का बसला असून २५ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता होणाऱ्या सुनावणीवेळी न्यायालय कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने या प्रकरणात तथ्यांबाबत मोठा वाद असल्याचे नमूद केले. याचिकेवर २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुनावणी निश्चित करण्यात आली. तसेच, याचिकाकर्त्यांना राज्य सरकारला प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश दिले.

सध्याची स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश

महापालिकेच्या वकिलांनी गुरुवारी सकाळी संबंधित ठिकाणी तोडकाम करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी महापालिकेचे कर्मचारी अर्ध्या तासात तेथून हटवण्यात येतील, अशी हमीही त्यांनी न्यायालयाला दिली. खंडपीठाने संबंधित पक्षांना आपले आक्षेप दाखल करण्याची परवानगी दिली. पुढील सुनावणीपर्यंत मालमत्तेची सध्याची स्थिती कायम ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

इमारत धोकादायक असल्याने कारवाई

पालिकेच्या सी-वॉर्डने १६ नोव्हेंबरला हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना इमारतीला नोटीस बजावून रहिवाशांना घर रिकामे करण्याचे आदेश दिले होते. ही इमारत धोकादायक असल्याने सी-१ श्रेणीत मोडते, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी बुलडोझर आणि मोठ्या मशिनरीसह पालिकेच्या पथकाने मुसाफिरखान्याचा काही भाग पाडण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पाडकाम सुरू असतानाच दोन रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान या मालमत्तेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहितीही न्यायालयाला देण्यात आली. मात्र, या दोन्ही न्यायालयीन कार्यवाही वेगवेगळ्या असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने या मुद्द्यावर कोणतेही विशिष्ट निरीक्षण नोंदवणे टाळले.

तोडकामाच्या नोटिशीला आव्हान

शेख अब्दुल रझाक आणि अन्य एका याचिकाकर्त्याने ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी मुंबई महापालिकेच्या सी. विभागाने १६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या जागा रिकामी करण्याच्या आणि तोडकामाच्या नोटिशीला आव्हान दिले आहे. या वादाचा संबंध हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना ट्रस्टच्या मालमत्तेशी आहे. या मालमत्तेत मशिदीचाही समावेश आहे. याचिकेनुसार, हाजी इस्माईल हाजी हबीब यांनी १८६४ मध्ये हज यात्रेकरूंसाठी मुसाफिरखाना (विश्रामगृह) आणि मशिदीच्या वापरासाठी ही मालमत्ता समर्पित केली होती.

संबंधित मालमत्ता वक्फ बोर्डाची

याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, ही मालमत्ता वक्फची असून महापालिकेची तोडकामाची कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या विरोधात आहे. या मालमत्तेच्या पुनर्विकासाचा संबंध सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) यांच्याशीही आहे. महापालिकेने विद्यमान न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करून तसेच निर्धारित प्रक्रियेचे पालन न करता तोडकामाची नोटीस जारी केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

कारवाई पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी

या मोहिमेसाठी सुमारे ८० कामगार, चार जेसीबी, क्रेन व महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तैनात होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटाही परिसरात तैनात करण्यात आला होता. इमारतीच्या आवारात प्रार्थनास्थळ असल्याने त्याला कोणताही धक्का न लावता इतर बांधकाम पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. कारवाई पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांकडून परिसरात विशेष खबरदारी घेण्यात आली होती.

बॉम्बस्फोटांच्या कटाची येथेच केली आखणी?

भेंडी बाजारातील पाकमोडिया लेन परिसरात असलेल्या या मुसाफिरखान्याच्या इमारतीला दाऊद इब्राहिमच्या पूर्वीच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दाऊदचे घर आणि कार्यालय याच इमारतीत होते. १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या कटाची आखणी याच ठिकाणी झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या इमारतीवरील कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते.

मुसाफिरखान्याची ७० टक्के इमारत जमीनदोस्त

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर आणि कार्यालय असलेल्या भेंडी बाजारातील हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखान्याच्या धोकादायक इमारतीवर गुरुवारी मुंबई महापालिकेने हातोडा चालवला. सकाळी साडेआठ वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू झालेली ही कारवाई दुपारी साडेतीनच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे थांबवण्यात आली. तोपर्यंत इमारतीचे सुमारे ६० ते ७० टक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेला पाडकामाची कारवाई अर्धवट सोडावी लागली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)