

मुंबईत मान्सून दाखल होण्यापूर्वी पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिकेची तयारी युद्धपातळीवर सुरू असून शहरातील ८० टक्क्यांहून अधिक नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सोमवारी दिली. नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
त्या म्हणाल्या की, यंदा मान्सूनपूर्व तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी नालेसफाईची मोहीम नेहमीपेक्षा एक महिना आधी सुरू करण्यात आली. शहरातील बहुतांश मोठे आणि लहान नाले ८० टक्क्यांहून अधिक साफ करण्यात आले असून उर्वरित कामेही वेगाने पूर्ण केली जात आहेत.
हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात येत्या काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने तयारी अधिक मजबूत केली आहे.
मोठ्या नाल्यांच्या गाळ काढण्याच्या कामाला वेग
महापालिकेच्या ३१ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पूर्ण झाले असून एकूण प्रगती १०१.४७ टक्क्यांवर पोहोचली आहे. यामध्ये शहर विभागात ११० टक्के, पश्चिम उपनगरात १०६.८५ टक्के तर पूर्व उपनगरात ८९.६९ टक्के काम पूर्ण झाले आहे.
लहान नाल्यांची सफाईही पूर्णत्वाकडे
लहान नाल्यांच्या सफाईच्या कामातही अनेक विभागांनी अपेक्षेपेक्षा जास्त काम पूर्ण केले आहे. शहरातील एकूण प्रगती १०१.३५ टक्के नोंदवण्यात आली आहे.
जी/दक्षिण विभागात १३५.०५ टक्के, डी विभागात १३३.३५ टक्के, पी/दक्षिण विभागात १२१.८१ टक्के आणि के/पश्चिम विभागात १११.१० टक्के काम पूर्ण झाले आहे.
मात्र काही विभागांमध्ये काम अद्याप मागे आहे. एस विभागात केवळ १५.७३ टक्के तर एम/पूर्व विभागात ८९.८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मान्सूनपूर्व उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
मिठी नदीतील गाळ काढण्याचे ६८ टक्के काम पूर्ण
मुंबईतील पूरस्थिती नियंत्रणासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिठी नदी गाळ काढण्याच्या प्रकल्पाची एकूण प्रगती ६८.४८ टक्के झाली आहे.
तीन विभागांपैकी ईएस-५२६ विभागात सर्वाधिक ७७.२७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ ईएस-५२७ विभागात ६९.७१ टक्के आणि ईएस-५२५ विभागात ५७.८३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष
गेल्या काही वर्षांत मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेकदा मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदा महापालिकेने नालेसफाईबरोबरच पंपिंग स्टेशन, पाणी तुंबणारी ठिकाणे आणि पर्जन्यजल वाहिनी व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
महत्त्वाच्या कामांचा नियमित आढावा घेतला जात असून मान्सून पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.