परदेशात नोकरीचे आमिष दाखवून १८० तरुणांची फसवणूक; मुंबईत बनावट प्लेसमेंट रॅकेटचा पर्दाफाश; चौघे अटकेत

या प्रकरणात आरोपींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिराती देऊन परदेशात ड्रायव्हर, हेल्पर, फिटर आणि पॅकिंग कामगारांच्या नोकऱ्या उपलब्ध असल्याचा दावा केला. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येकी ३० हजारांपासून ते अडीच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात होती. याशिवाय बनावट वैद्यकीय तपासण्या, खोटे व्हिसा आणि फ्लाइट तिकिटे देण्यात येत होती.
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून १८० तरुणांची फसवणूक; मुंबईत बनावट प्लेसमेंट रॅकेटचा पर्दाफाश; चौघे अटकेत
Published on

मुंबई : परदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सुमारे १८० तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २ महिलांचाही समावेश आहे. आरोपींकडून पीडितांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले असून, केंद्रीय मंत्री व खासदार पीयूष गोयल यांच्या हस्तक्षेपानंतर सर्व पासपोर्ट पीडितांना परत देण्यात आले आहेत.

प्रकरणाचा तपशील काय?

समता नगर पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्समधील डिंपल आर्केड, ऑफिस क्रमांक २३० येथे ‘स्टार मॅन पॉवर’ नावाची बनावट कंपनी चालवत होते. देव राज यादव, आशीष कुमार, वर्मा (पहिले नाव अज्ञात), अजान, आयशा अन्सारी, पूजा यादव, रंजना कामत आणि काजल गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत.

या आरोपींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिराती देऊन परदेशात ड्रायव्हर, हेल्पर, फिटर आणि पॅकिंग कामगारांच्या नोकऱ्या उपलब्ध असल्याचा दावा केला. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येकी ३० हजारांपासून ते अडीच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात होती. याशिवाय बनावट वैद्यकीय तपासण्या, खोटे व्हिसा आणि फ्लाइट तिकिटे देण्यात येत होती. सुमारे १८० तरुणांचे पासपोर्ट आरोपींकडे ठेवण्यात आले होते. पैसे रोख तसेच ऑनलाईन पद्धतीने विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले जात होते.

तक्रारदाराचा अनुभव

२५ वर्षीय महेश चौहान या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, तो नोव्हेंबर महिन्यात आरोपींच्या कार्यालयात गेला होता. रशियामध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्याचा पासपोर्ट घेण्यात आला. त्याच्याकडून ७५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी ३५ हजार रुपये त्याने आधी भरले. ११ नोव्हेंबर रोजी पासपोर्ट व फ्लाइट तिकीट घेण्यासाठी तो कार्यालयात गेला असता कार्यालय बंद आढळले. काही वेळाने तेथे शंभराहून अधिक लोक जमा झाले आणि सर्वजण पासपोर्ट व तिकिटांसाठीच आले असल्याचे स्पष्ट झाले. काही जणांना तर खोटे व्हिसा व फ्लाइट तिकिटे देण्यात आली होती.

मुख्य आरोपी देव राज यादवचा मोबाइल बंद असल्याचे, तसेच इतर आरोपीही संपर्काबाहेर असल्याचे लक्षात येताच सर्व पीडितांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलीस कारवाई आणि कायदेशीर बाबी

या तक्रारीवरून ३ डिसेंबर रोजी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१८(४) (फसवणूक), ३१६(२) (विश्वासघात) आणि ६१(२) (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला. सुरुवातीला कारवाईला काहीसा विलंब झाल्याचा आरोप पीडितांनी केला. त्यानंतर त्यांनी कांदिवली पश्चिमेतील भाजप कार्यालयात धाव घेतली तसेच वाणिज्य व उद्योग मंत्रालयाशी संपर्क साधला.

पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री व खासदार पीयूष गोयल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी देशातील तरुणांचे हित, सन्मान आणि भविष्य सुरक्षित ठेवणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. तरुणांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा टोळीवर कठोर आणि तातडीची कारवाई केली जाईल.” या प्रकरणात पोलिसांनी केलेली जलद कारवाई, पासपोर्टची जप्ती आणि पीडितांना दिलासा मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास समता नगर पोलीस करत असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in