

मुंबई : खाद्यसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील सहा खाद्य आस्थापनांचे अन्न परवाने/नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित केली आहेत. यामध्ये कुलाब्यातील प्रतिष्ठित बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि खार जिमखान्यासह कुलाब्यातील मॅकडोनाल्ड्सचे एक आऊटलेट, मालाडमधील नोव्हारा, नरिमन पॉइंट येथील स्टेटस रेस्टॉरंट आणि सांताक्रूझ पश्चिम येथील बजरंग स्वीट मार्टचा समावेश आहे.
अन्नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. १९ आणि २० ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, अन्नपदार्थांमध्ये दूषितता निर्माण होण्याचा धोका, अयोग्य पद्धतीने अन्न साठवणूक तसेच तापमान नियंत्रणाचा अभाव अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या.
रेडिओ क्लबमध्ये झुरळे, माशांचा प्रादुर्भाव बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबमध्ये १९ ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत स्वयंपाकघराच्या परिसरात माशांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळला. भांडी धुण्याच्या ठिकाणाजवळ मृत झुरळ तसेच झुरळ पकडण्यासाठी लावलेले सापळे आढळले. अन्न तयार करण्याच्या जागेच्या थेट वर छताचा प्लास्टर उखडलेला होता. तसेच वॉशिंग पावडर आणि रसायने अन्नपदार्थांच्या शेजारी ठेवण्यात आली होती.
भांडी आणि अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवले जात असल्याचेही आढळले. तपासणीत आस्थापनाचे ४७ टक्के नियमभंग आढळले. त्यामुळे एफडीएने अन्न व्यवसायाचा परवाना तत्काळ निलंबित करून निलंबनाच्या कालावधीत अन्नपदार्थांची खरेदी, विक्री आणि वितरण बंद करण्याचे आदेश दिले.
खार जिमखान्यात कच्चे-पक्के अन्न एकत्र
खार जिमखान्यात अन्नसाठवणुकीसाठी अपुऱ्या सुविधा, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आणि कच्चे व शिजवलेले तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे आढळले. उपकरणांची योग्य प्रकारे स्वच्छता केली जात नव्हती. भांडी धुण्यासाठी गरम पाण्याचीही व्यवस्था नव्हती.
याशिवाय ‘फर्स्ट इन, फर्स्ट आऊट’ आणि ‘फर्स्ट एक्सपायरी, फर्स्ट आऊट’ पद्धतींचे पालन केले जात नव्हते. खाद्यतेलाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी तसेच निर्धारित तापमान नियंत्रणाच्या नियमांचेही पालन होत नसल्याचे एफडीएच्या तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे जिमखान्याचे एफएसएसएआय नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. तसेच अन्नपदार्थांचा साठा, उत्पादन, खरेदी, विक्री आणि वितरण करण्यास मनाई करण्यात आली.
मॅकडोनाल्ड्सच्या आऊटलेटवरही कारवाई
कुलाब्यातील मेट्रो हाऊसमधील मॅकडोनाल्ड्सच्या किऑस्कचा परवानाही एफडीएने निलंबित केला आहे. यापूर्वी निदर्शनास आणून दिलेल्या २० त्रुटींपैकी १८ त्रुटी पुन्हा तपासणीच्या वेळीही दूर करण्यात आलेल्या नव्हत्या. तपासणीत झुरळांचा प्रादुर्भाव, सडलेला अन्नकचरा, योग्य प्रकारे कॅलिब्रेट न केलेली रेफ्रिजरेशन उपकरणे आणि अस्वच्छता आढळली.
विशेष म्हणजे, आऊटलेटने सादर केलेल्या अनुपालन अहवालात त्रुटी दूर केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरच्या तपासणीत त्यातील अनेक त्रुटी कायम असल्याचे एफडीएने नमूद केले.
नोव्हारामध्ये १४ त्रुटी कायम
मालाड येथील नोव्हारा येथेही गंभीर त्रुटी कायम असल्याचे आढळले. यापूर्वीच्या सुधारणा नोटिशीत नमूद केलेल्या २५ गंभीर त्रुटींपैकी १४ त्रुटी १३ ऑगस्ट रोजीच्या पुनर्तपासणीतही दूर करण्यात आलेल्या नव्हत्या.
जुनी स्वयंपाकाची उपकरणे वापरणे, ग्रीस आणि झुरळांसाठी सापळे नसणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी नसणे तसेच अनिवार्य प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, अशा त्रुटी एफडीएने नोंदवल्या.
बजरंग स्वीट मार्टला केवळ ४७ टक्के गुण
सांताक्रूझ पश्चिम येथील बजरंग स्वीट मार्टवरही एफडीएने कारवाई केली. तपासणीत आस्थापनाला ८६ पैकी केवळ ४० गुण मिळाले, म्हणजेच ४७ टक्के अनुपालन आढळले.
तपासणीत खराब झालेले फरशीचे भाग, उखडलेला प्लास्टर, गंजलेली उपकरणे, अपुरी साठवणूक व्यवस्था, अन्नपदार्थांच्या तपासणीच्या नोंदींचा अभाव तसेच अन्नपदार्थांची योग्य विभागणी न केल्यासारख्या त्रुटी आढळल्या.
परवाने निलंबित केलेल्या सर्व आस्थापनांना निलंबनाच्या कालावधीत अन्नाशी संबंधित सर्व व्यवहार थांबविण्याचे निर्देश एफडीएने दिले आहेत. वैध परवान्याशिवाय व्यवसाय सुरू ठेवल्यास अन्नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही एफडीएने दिला आहे.
ग्राहकांच्या तक्रारी
नरिमन पॉइंट येथील स्टेटस रेस्टॉरंटविरोधात ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफडीएने तपासणी केली. २० ऑगस्ट रोजी झालेल्या तपासणीत कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता समाधानकारक नसणे, अस्वच्छ भांडी, पाणी साचणे, मोठ्या प्रमाणात ग्रीस जमा होणे, तापमानावर योग्य देखरेख नसणे तसेच कच्चे, शिजवलेले, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांची योग्य विभागणी नसल्याचे आढळले. त्यामुळे रेस्टॉरंटचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला.