Mumbai Deluge 2005 : मुंबई महापुराची कहाणी अन् एका धाडसी अधिकाऱ्याची शौर्यगाथा

Mumbai Deluge 2005 : मुंबई महापुराची कहाणी अन् एका धाडसी अधिकाऱ्याची शौर्यगाथा

२६ जुलै २००५ हा दिवस मुंबईकरांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. मुसळधार पाऊस आणि मुंबईचा महापूर आजही आठवला, की अंगावर काटा येतो. मुंबईत अवघ्या २४ तासांत ९४४ मिमी इतकी अभूतपूर्व पर्जन्यवृष्टी झाली.
Published on

२६ जुलै २००५ हा दिवस मुंबईकरांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. मुसळधार पाऊस आणि मुंबईचा महापूर आजही आठवला, की अंगावर काटा येतो. मुंबईत अवघ्या २४ तासांत ९४४ मिमी इतकी अभूतपूर्व पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी, मुंबईत जागोजागी अचानक पूर आला. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आणि वाहतूक ठप्प झाली. या महापुरात सुमारे १ हजारहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. या प्रलयकारक परिस्थितीत, मुंबई फायर ब्रिगेडचे तत्कालीन मुख्य अधिकारी प्रभात रहांगदळे आणि त्यांच्या टीमने धाडस दाखवून ३०० लोकांचे प्राण वाचवले.

या भयावह आठवणी स्मरताना प्रभात रहांगदळे सांगतात, की "मी हजारो रेस्क्यू ऑपरेशन्स केलेत, पण काही प्रसंग मनात कायमचे राहतात. यावेळी एका विजेच्या खांबावर लहान मुलाला खांद्यावर घेऊन उभी असलेली बाई आणि बसमध्ये मदतीची याचना करणारे दिव्यांग, आजही विसरलेलो नाही.''

प्रभात रहांगदळे आणि त्यांच्या टीमने कुर्ला पश्चिम, बीकेसी आणि कलिना या भागांतून अनेक नागरिकांना वाचवले. रहांगदळे यांनी त्यावेळी मुंबई फायर ब्रिगेड आणि महानगरपालिकेकडे समर्पित पूर बचाव पथकाची कमतरता अनुभवली. म्हणूनच, त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील साहसी कार्यांत तज्ञ असलेल्या एजन्सीकडून कर्मचारी घेऊन बचावकार्य सुरू केले. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी साहसी खेळांमध्ये वापरली जाणारी कायक्स आणि जेट स्कीज वापरली.

धोकादायक प्रवास आणि रेस्क्यू ऑपरेशन

रहांगदळे आणि त्यांच्या टीमने सायन सर्कलमार्गे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधून कलानगरकडे जीपने प्रवास केला. त्यावेळी रस्त्यावर पाणी साचले होते आणि वाहने अडकली होती. त्यांनी सांगितले, की "त्या दिवशी फक्त तीन गाड्या कलानगर क्रॉसिंगवर पोहोचल्या. आमची जीप बंद पडली नाही, हेच आमचे नशीब.''

बीकेसी पूर्वेकडील एमटीएनएल इमारतीत कमांड सेंटर उभारल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. यावेळी एका भयानक दृश्याची आठवण करताना रहांगदळे यांनी सांगितले, की मिठी नदी समोरच्या तीरावर एक डबल-डेकर बस जवळजवळ पूर्णपणे चिखलात बुडाली होती. त्याचं फक्त छत दिसत होतं. बचाव तयारी दरम्यान त्यांना एका महिलेचा मदतीसाठी ओरडण्याचा आवाज आला. ती एका लहान मुलाला खांद्यावर घेऊन वीज फीडरच्या खांबावर कशीबशी जीव वाचवत उभी होती. पाण्याची पातळी तिच्या कंबरेपर्यंत वाढू लागल्याने, टीमला वेळ संपत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब एक कायाक आणि जेट स्की तैनात केले आणि त्या महिलेला वाचवण्यात यश आले.

रहांगदाळे म्हणाले, की "त्या बाईने सांगितले, की ती ९० मिनिटे एलबीएस रोड जंक्शनवर अडकून पडली होती. पण, मला अजूनही आश्चर्य वाटते की सर्व दिशांनी पाणी वाहत होते तरीही ती एका मुलाला घेऊन खांबावर कशी चढली असावी?"

दिव्यांग व्यक्तींचा आणि मुलींचा वाचवला जीव

दुसऱ्या एका दृश्याचे वर्णन करताना रहांगदाळे यांनी सांगितले, की तिथून काही अंतरावरच दिव्यांग व्यक्ती, मुली आणि इतर नागरिक असे २०-२५ लोकं एका बसमध्ये अडकले होते. त्यांना मागच्या आपत्कालीन खिडक्यांमधून बाहेर काढण्यात आलं. दोन बसमध्ये ३०० मीटर अंतरावर एक दोरी बांधण्यात आली, ज्यामुळे अडकलेल्या गटाला प्रथम कायाकद्वारे डबल-डेकर बसच्या छतावर आणि शेवटी एमटीएनएल इमारतीत सुरक्षितपणे पोहोचवलं. या दोन्ही प्रसंगात लोकांना सुरक्षित बाहेर काढल्याने मनाला वेगळंच समाधान मिळाल्याचे रहांगदाळे म्हणाले.

पूर बचावकार्याचे प्रशिक्षण न घेताही केलं धाडस

प्रभात रहांगदळे यांनी मुंबईतील हॉटेलवरील दहशतवादी हल्ला आणि नौदल डॉकयार्डवरील सबमरीन आगीतही नेतृत्व केलं आहे. २६ जुलैच्या पावसावेळी ते मुंबई फायर ब्रिगेडचे मुख्य अधिकारी होते. प्रभात रहांगदळे यांनी सांगितले की, त्या काळात मुंबईकडे कोणतंही अधिकृत पूर बचाव पथक नव्हतं. त्यांचं प्रशिक्षण कोसळलेल्या इमारतींमध्ये शोध आणि बचावकार्य यावर झालं होतं. पण, त्यांनी सुदैवाने २००४ मध्ये इंडोनेशियातील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेदरम्यान पूर बचावाचा एक छोटासा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि तो यावेळी कामी आला. ते आता उपमहानगरपालिका आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत.

नवीन बचाव पथकांची स्थापना

या पुरानंतर त्यांच्यावर सहा महिन्यांत पूर बचाव पथक तयार करण्याचे काम देण्यात आले. त्या दरम्यान त्यांनी १६० कर्मचाऱ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले. २६ जुलै नंतर त्यांनी पूर बचाव आणि बीच सेफ्टी टीम्स स्थापन केल्या. त्यामुळे पुढील घटनेत अनेक जीव वाचवण्यात यश आल्याचं ते अभिमानाने सांगतात.

२००५ च्या पुरानंतर मुंबईतील बदल

आता मुंबई फायर ब्रिगेड आधुनिक साधनांद्वारे सुसज्ज आहे. बोट, कायाक आणि जेट स्कीसह पूर बचाव पथक तयार झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा पथकांच्या स्थापनेमुळे मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in