
गणेशोत्सव आणि मुंबईकरांचे, तसेच महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे नाते अतूट आहे. दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईत उत्साह, भक्ती, आणि भव्य मिरवणुका पाहायला मिळतात. त्यात मुंबईतील काही खास गणेश मंडळं उंच मूर्ती, सुंदर सजावट आणि हजारोंच्या संख्येतील भक्तांच्या गर्दीमुळे ओळखली जातात. मात्र, यंदा एक वेगळाच आणि लक्षवेधी प्रसंग घडला. मुंबईच्या कांदिवलीतील ‘चारकोपचा राजा’ आणि 'श्री गणपती' या दोन्ही मंडळांच्या गणेशमूर्तीचे १७७ दिवसांनी, म्हणजे तब्बल सहा महिन्यांनी आज (२ ऑगस्ट) अखेर विसर्जन होत आहे.
विसर्जनासाठी कोर्टाचा लढा
गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) गणेशमूर्तींच्या विसर्जनावर पर्यावरणपूरकतेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. यंदाच्या माघी गणेशोत्सवातही ही बंदी लागू होती. त्यामुळे अनेक मंडळांनी गणपतीचे कृत्रिम तलावांत विसर्जन केलं. मात्र, ‘चारकोपचा राजा’ आणि 'श्री गणपती' या मंडळांनी याला विरोध केला आणि आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
‘चारकोपचा राजा’ -
मंडळांच्या आग्रहामुळे आणि PoP मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात नियमांवर सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यामुळे बाप्पाचं विसर्जन रखडत राहिलं. याच पार्श्वभूमीवर बाप्पा मागील १७७ दिवसांपासून मंडपातच विराजमान होते. यासंदर्भात मंडळाने सोशल मीडियावरून स्पष्टीकरणही दिलं होतं की, "न्यायालयीन निर्णय येईपर्यंत आम्ही बाप्पाचं सन्मानाने जतन करणार."
'श्री गणपती' -
अखेर न्यायालयाचा निर्णय आणि भक्तांचा उत्साह
दरम्यान, २४ जुलै रोजी उच्च न्यायालयाने सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेशमूर्तीचे विसर्जन समुद्रात आणि इतर नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये करण्यास परवानगी दिली. त्यामुळे 'चारकोपचा राजा' आणि 'श्री गणपती' या दोन्ही मंडळांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन मोठ्या जल्लोषात होत आहे.
मिरवणुकीसाठी ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, भक्तांचा जल्लोष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बाप्पा मार्गस्थ झाल्याने, उत्सवाचे स्वरूपच वेगळे झाले आहे.