Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

Mumbai Ganpati Visarjan 2026: अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनासाठी मुंबईतील वाहतूक बदल, बंद मार्ग, पर्यायी रस्ते, लोकल आणि मेट्रो सेवेबाबत महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या.
Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट
Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट'एआय'ने संपादित केलेली प्रतिमा
Published on

गणेशोत्सवाची सांगता होत असून शुक्रवार, २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. लालबागचा राजा तसेच विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने शहराती अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंद, वळवणे आणि ‘नो पार्किंग’चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी कोणते मार्ग बंद आहेत आणि पर्यायी रस्ते कोणते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मुंबईत कुठे वाहतूक निर्बंध?

दक्षिण मुंबई : कुलाबा, मरीन ड्राईव्ह, कळबादेवी, गिरगाव, पायधुनी, डी. बी. मार्ग आणि ताडदेव परिसरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद, वळवणे आणि नो पार्किंगचे निर्बंध लागू राहतील. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी या भागात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

दादर : स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, केळुसकर रोड, एम. बी. राऊत रोड आणि टिळक फ्लायओव्हर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

जुहू : जुहू तारा रोड आणि जुहू चर्च रोडवर निर्बंध राहतील. काही मार्गांवर एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.

मुलुंड : दीनदयाळ उपाध्याय मार्ग म्हणजेच डम्पिंग रोड आणि टँक रोड बंद राहणार आहेत. वाहनचालकांसाठी एल. बी. एस. मार्ग, देवीदयाळ रोड, पाच रस्ता आणि मुलुंड रेल्वे स्थानकाकडील पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.

जेव्हीएलआर : २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जेव्हीएलआरवर अवजड वाहनांना निर्बंध असतील.

उत्तर-दक्षिण प्रवासासाठी कोस्टल रोडचा पर्याय

उत्तर आणि दक्षिण मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शक्य असल्यास कोस्टल रोडचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकांच्या मार्गांवरील गर्दी टाळण्यासाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.

चर्नी रोडवर लोकलच्या थांब्यात बदल

गिरगाव चौपाटी परिसरातील गर्दी लक्षात घेता २५ सप्टेंबरला पश्चिम रेल्वेने चर्नी रोड स्थानकावरील लोकलच्या थांब्यांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे या भागात विसर्जनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या ताज्या सूचना तपासूनच प्रवास करावा.

रात्रीच्या विशेष लोकलची सुविधा

विसर्जनानंतर प्रवाशांना घरी परतता यावे यासाठी मध्य रेल्वे २५ आणि २६ सप्टेंबरच्या रात्री विशेष लोकल चालवणार आहे. सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-ठाणे आणि सीएसएमटी-पनवेल या मार्गांवर विशेष फेऱ्या धावतील.

मेट्रो लाईन ३ रात्रभर धावणार

गणपती विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मेट्रो लाईन ३ची सेवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्रभर सुरू राहणार आहे. विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी मेट्रोची ही अतिरिक्त सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.

लालबागच्या राजाचे मुखदर्शन कधीपर्यंत?

लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग गुरुवारी सकाळी ६ वाजता बंद झाली आहे. मात्र, मुखदर्शनाची रांग आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर विसर्जनाच्या तयारीला सुरुवात होईल. प्रत्यक्ष दर्शनासाठी जाता न आल्यास ऑनलाइन दर्शनाची सुविधाही उपलब्ध आहे.

विसर्जन कुठे पाहता येईल?

मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू बीच, वर्सोवा बीच, पवई तलाव, गोराई बीच आणि अक्सा बीच ही प्रमुख ठिकाणे आहेत. मात्र, या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक निर्बंध लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.

दरम्यान, विसर्जनाच्या गर्दीसाठी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही, एआय कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in