

भारतामध्ये रस्ते, समुद्रकिनारे आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर कचरा टाकण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. स्वच्छतेबाबत जनजागृतीचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नागरिकांची बेफिकिरी पुन्हा पुन्हा समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ या समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकतो आहे.
परदेशी पर्यटकाच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडीओ मुंबईतील ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर ओळख असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातील आहे. पर्यटक परिसरातील दृश्य टिपत असताना अचानक घडलेली घटना त्याच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
अन् कचरा थेट समुद्रात
पर्यटक गेट वे ऑफ इंडियाजवळील सेफ्टी वॉलवर बसून समुद्र आणि आजूबाजूचा परिसर शूट करत होता. तितक्यात हेल्मेट घातलेली एक व्यक्ती आपल्या मुलीसह तिथे येते. क्षणभर थांबून हातातल्या पिशवीतील कचरा तो थेट समुद्रात टाकतो. हे सगळं पाहून पर्यटक अक्षरशः हादरतो. लगेचच तो आश्चर्याने, “हे काय होतं?” असं म्हणतो. यानंतर “हे योग्य नाही” असे स्पष्ट मतही तो मांडतो. मात्र संबंधित व्यक्तीला या गोष्टीचं कोणतंही भान नसल्याचं दिसतं. तो कोणतीही खंत, लाज किंवा अपराधभाव न दाखवता मुलीसह तिथून निघून जातो.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक युजर्सनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “अशा लोकांकडून मोठा दंड आकारला पाहिजे,” तर “पर्यटनस्थळांवर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी उपरोधिक सूर लावत, “भारतामध्ये हे नेहमीचं वर्तन आहे,” असे म्हटले आहे. अनेकांनी थेट महापालिका, मुंबई पोलीस आणि प्रशासनाला टॅग करत प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः समुद्रात कचरा टाकण्याबाबत नेमके काय नियम आहेत? आणि अशा घटनांवर तात्काळ कारवाई का होत नाही? असा सवाल विचारला जात आहे. "@MumbaiPolice @CPMumbaiPolice त्याचा चेहरा स्पष्ट दिसतोय, काहीतरी कारवाई करा," अशा पोस्ट्सही मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत.
गेटवे ऑफ इंडिया हे केवळ मुंबईचंच नव्हे, तर भारताचं आंतरराष्ट्रीय ओळख असलेलं पर्यटनस्थळ आहे. अशा ठिकाणी घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण देशाची प्रतिमा कलंकित होते. त्यामुळे स्वच्छता, नियमांचे पालन आणि जबाबदारीची जाणीव ही केवळ प्रशासनाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हेच या व्हायरल व्हिडीओमधून पुन्हा एकदा अधोरेखित होतं.