Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

मंगळवारी रात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसानंतर टेकडीचा काही भाग खचला आणि त्याचा ढिगारा चाळीतील दोन ते तीन खोल्यांवर कोसळला.
Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video
Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video(Photo-X)
Published on

मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरातील चिराग नगर येथे बुधवारी (दि. १२) पहाटेच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. टेकडीचा काही भाग जवळील गौशिया चाळीवर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून ६ जणांचा मृत्यू झाला असून, आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. सततच्या पावसामुळे ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

टेकडीचा काही भाग खचला अन्...

चिराग नगर परिसरातील राठोड मेडिकलजवळील गौशिया चाळीत बुधवारी पहाटे सुमारे ३.४८ वाजता भूस्खलन झाले. मंगळवारी रात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसानंतर टेकडीचा काही भाग खचला आणि त्याचा ढिगारा चाळीतील दोन ते तीन खोल्यांवर कोसळला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

मृतांचा आकडा सहावर

सुरुवातीला या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. त्यानंतर बचावकार्य सुरू असताना मृतांचा आकडा वाढत गेला असून, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी साहिल अन्सारी (२८) आणि मोहम्मद समीर (१४) यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आणखी काही जण अडकल्याची भीती

दुर्घटनेनंतर सुरुवातीला तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार हा आकडा वाढण्याची शक्यता असून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचाव पथकांकडून ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

५० महापालिका कर्मचारी, एनडीआरएफकडून बचावकार्य

मुंबई अग्निशमन दलाने पहाटे सुमारे ४.३२ वाजता या घटनेला 'लेव्हल-२' आपत्कालीन घटना घोषित केली. त्यानंतर विशेष बचाव उपकरणांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. महापालिकेचे सुमारे ५० कर्मचारी आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणांचे कर्मचारीही बचावकार्यात सहभागी आहेत.

दोन जखमी रुग्णालयात

या दुर्घटनेत आणखी दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोक्याला दुखापत झालेल्या सोहेल अन्सारी (१८) आणि मोहम्मद अन्सारी (१४) यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापौरांसह अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सततच्या पावसामुळे दुर्घटना

मंगळवारी रात्रीपासून मुंबईत अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. त्यानंतर घाटकोपरच्या डोंगर उतारावरील माती खचल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात ही घटना घडल्याने प्रशासनासमोर बचावकार्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

धोकादायक भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांची प्रशासन आणि आपत्ती प्रतिसाद पथकांकडून यापूर्वी पाहणी करण्यात आली होती. धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून परिसरातील धोकादायक घरांची आणि डोंगर उतारांची पुन्हा पाहणी होण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा सहावर पोहोचल्याने या दुर्घटनेचे गांभीर्य वाढले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in