

गाढ झोपेत असलेल्या एका कुटुंबासाठी शनिवारची पहाट काळ ठरली. मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग नगर परिसरात मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भीतीचं वातावरण पसरलं आहे.
गाढ झोपेत असताना आग भडकली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेतील भगतसिंग नगर येथील तळमजल्यावरील घरात आग लागली. ही घटना शनिवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास घडली. पावस्कर कुटुंब घरात गाढ झोपेत असताना अचानक ही आग भडकली. आगीचे लोळ पाहताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र आग तीव्र असल्याने हे प्रयत्न अपुरे ठरले.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वीजपुरवठा खंडित करून जवानांनी पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना बाहेर काढून तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले. मृतांमध्ये संजोग पावस्कर (४८), हर्षदा पावस्कर (१९) आणि कुशल पावस्कर (१२) यांचा समावेश आहे.
सकाळी सुमारे ३.१६ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. आगीचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.