Mumbai: "रडत-रडत मदत मागत होते पण...; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला भररस्त्यात छेडलं, पोलीस हेल्पलाईनचाही प्रतिसाद 'शून्य'

या घटनेनंतर तरुणीने तत्काळ मदतीसाठी प्रयत्न केला. मात्र, तिने केलेल्या दाव्यानुसार, १०० नंबर, महिला सुरक्षा हेल्पलाईन आणि इमर्जन्सी नंबर यापैकी एकाही नंबरवरून तिला प्रतिसाद मिळाला नाही.
Mumbai: "रडत-रडत मदत मागत होते पण...; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला भररस्त्यात छेडलं, पोलीस हेल्पलाईनचाही प्रतिसाद 'शून्य'
Published on

मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीची एका अज्ञात व्यक्तीने छेड काढली. या तरुणीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून संपूर्ण घटना सांगितली. "मदतीसाठी ओरडूनही कोणीच पुढे आले नाही आणि पोलिस हेल्पलाईनवरही संपर्क झाला नाही", असा गंभीर आरोप तिने केला आहे.

नेमकं काय घडलं?

तरुणीच्या म्हणण्यानुसार, २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९:४३ वाजता ही घटना गोरेगाव (पश्चिम) येथील रॅडिसन हॉटेलजवळील पुलावर घडली. ती फोनवर बोलत चालत होती. तेव्हा अचानक एक पुरुष मागून आला आणि त्याने तिची छेड काढली. यामुळे तिने घाबरून आरडाओरड केली. तेव्हा त्या अज्ञात व्यक्तीने आपल्या गाडीत बसून पळ काढला. ती तरुणी त्याच्या मागे धावत गेली, पण रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीमुळे तो तरुण तिला दिसला नाही. तिने सांगितलं की, "मी रस्त्याच्या मधोमध उभी होते. रडत-रडत मदत मागत होते, पण कोणीही थांबलं नाही."

या घटनेची माहिती या तरुणीने तिच्या सोशल मीडियाद्वारे दिली. त्यात तिने म्हटले, "मी रात्री काही किरकोळ कामांसाठी बाहेर पडली होती आणि अंगभर कपडे घातले होते. तरीसुद्धा अशा घटना घडतात आणि नंतर महिलेलाच दोष दिला जातो."

पोलिसांकडून प्रतिसाद नाही

या घटनेनंतर तरुणीने तत्काळ मदतीसाठी प्रयत्न केला. मात्र, तिने केलेल्या दाव्यानुसार, १०० नंबर, महिला सुरक्षा हेल्पलाईन आणि इमर्जन्सी नंबर यापैकी एकाही नंबरवरून तिला प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईला सुरक्षित शहर म्हटलं जातं, पण प्रत्यक्ष धोक्याच्या वेळी कोणतीही मदत न मिळाल्याचं तिने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

कायदेशीर कारवाईसाठी मदत हवी

शेवटी तिने नागरिकांना मदतीची विनंती करत लिहिले, “हा विषय पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा. कायदेशीर कारवाई पुढे कशी न्यावी, याबद्दल मला मार्गदर्शन हवं आहे.”

सध्या या प्रकरणात अधिकृत तक्रार दाखल झाल्याची माहिती नाही आणि पोलिसांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in