

मुंबई : ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ या होऊ घातलेल्या केईएम रुग्णालयाच्या नामांतराला विरोध आता वाढू लागला आहे. केईएम रुग्णालयाच्या निवासी डॉक्टर संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर आता पालिकेतील विरोधी पक्षानेही विरोधाचे हत्यार उपसले आहे. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ संगीता रावत यांना निवेदन देत पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे सेनेच्या वतीने निषेध नोंदवला.
शिवसेना ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रुग्णालयाच्या नामकरण प्रस्तावामुळे रुग्णालयाचा ऐतिहासिक वारसा पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.
गेल्या १०० वर्षांपासून केईएम रुग्णालयाची ओळख आहे. देशभरातील रुग्ण केईएम रुग्णालय यांच नावाने ओळखतात. मात्र आता परळ येथील केईएम रूग्णालय म्हणजेच ‘किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय’ हे अनेक गोरगरीब रुग्णांचे आधारस्थान आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून अनेक रुग्ण केईएम रुग्णालयात उपचाराकरिता येत असतात. २२ जानेवारी २०२६ रोजी केईएम रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत.
या रुग्णालयाला ऐतिहासिक महत्त्व असून जागतिक दर्जाचे डॉक्टर या रुग्णालयातून शिकून मोठे झाले आहेत. जगभरात केईएम रुग्णालय, परळ अशीच या रुग्णालयाची ओळख आहे. अशा या रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला असून याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. मंगलप्रभात लोढांना माझी विनंती आहे की, आपण मुंबईत जे टोलेजंग टॉवर बांधत आहात, त्यातील एका टॉवरमध्ये एखादे धर्मादाय रुग्णालय बांधावे व त्याचे नाव आपण सुचविल्याप्रमाणे द्यावे, असा टोला पेडणेकर यांनी लगावला.
मंत्री मंगलप्रभात लोढांच्या या प्रस्तावास स्थानिक आमदार म्हणून माझा व जनतेचा तीव्र विरोध असून असा कोणताही प्रयत्न आम्ही परळवासीय सहन करणार नाही. तरी याची आपण तीव्र गंभीर दखल घेऊन आरोग्य समिती मधील प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा, असे आमदार अजय चौधरी यांनी म्हटले आहे.
लोढा यांच्या कंपनीकडून बांधण्यात आलेल्या दक्षिण मुंबईतील एका टॉवरला इंग्रजी नाव दिले आहे. यातून लोढा यांचा दुटप्पीपणा समजतो, असा आरोप नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे.
ठाकरेंच्या दोन आमदारांचा आक्रमक पवित्रा
केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या विरोधात शिवसेनेचे ठाकरे गटाचे दोन आमदार अजय चौधरी आणि मिलिंद नार्वेकर हे आक्रमक झाले आहेत. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. ‘केईएमचे नाव बदलत असाल तर उद्या इतर ऐतिहासिक वास्तूंचीही नावे बदलणार का?’ असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ठाकरे गटाची निदर्शने
डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने या नामांतराला विरोध दर्शवला आहे. नुकतेच शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने या नामांतर निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात आली. नामांतराच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी यांनी केईएमच्या अधिष्ठाता संगीता रावत यांची भेट घेतली आणि डीनच्या केबिनबाहेर आंदोलन करून विरोध दर्शवला.