
शनिवारी (दि. १६) सकाळी मुंबईतील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसला. शहरात दहीहंडीचे वातावरण असतानाच भारतीय हवामान खात्याने (IMD) आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आला असून तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघरमध्ये पाऊस रविवारपासून सुरू होणार असून १९ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईतील सखल भागात साचले पाणी
रात्रभर झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. सायन-किंग सर्कल, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, वाशी आणि वसई-विरार येथील रस्त्यांवर पाणी साचल्याची नोंद झाली आहे. सायन स्टेशनवर लोकलच्या ट्रॅकवर पाणी साचलं असून, वांद्रे आणि अंधेरीत रस्त्यांवरून वाहनं हळूहळू सरकत आहेत. वाशी परिसरात पाणी साचल्याने पादचाऱ्यांना प्रवासात अडचणी निर्माण झाल्या.
सेवांमध्ये मर्यादित व्यत्यय
गेल्या वर्षी अशा परिस्थितीत शहर ठप्प झालं होतं, मात्र यावेळी परिस्थिती तुलनेने सुरळीत आहे. उपनगरीय लोकल सेवा थोड्या उशिराने का होईना, पण सुरू आहेत. प्रमुख रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याचे श्रेय सुधारित ड्रेनेज व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व तयारीला दिले आहे.
IMD च्या आकडेवारीनुसार, पावसाळ्याच्या सुरुवातीपासून कुलाबा वेधशाळेत १,११९.२ मिमी तर सांताक्रूझ वेधशाळेत १,४३५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबई हंगामी सरासरी पावसावर मात करण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई पोलिसांचा इशारा
मुंबई पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून त्यांनी नागरिकांना सूचनाही केल्या आहेत. त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून दृश्यमानता कमी झाली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि बाहेर पडताना काळजी घ्यावी. पोलिस कर्मचारी संकटाच्या वेळी उच्च सतर्क राहतील व आवश्यकतेनुसार मदत करतील. आपत्कालीन परिस्थितीत १००, ११२ आणि १०३ हे हेल्पलाइन क्रमांक सक्रिय ठेवण्यात आले आहेत.