मुंबईसाठी पुढचे तीन तास महत्त्वाचे; संध्याकाळी समुद्राला येणार भरती, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

राज्यात गेले ४ दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसामुळे ८ जणांचा मृत्यू झाला. तर, मुंबईत याहून अधिक विक्रमी पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईसाठी पुढचे तीन तास महत्त्वाचे; संध्याकाळी समुद्राला येणार भरती, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Published on

राज्यात गेले ४ दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसामुळे ८ जणांचा मृत्यू झाला. तर, मुंबईत याहून अधिक विक्रमी पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काही भागांत तब्बल ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून शहराच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. लोकल सेवा बंद असल्या तरी हळूहळू पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील तीन तास मुंबईसाठी निर्णायक ठरणार असून, संध्याकाळी समुद्राला भरती आल्याने परिस्थिती आव्हानात्मक होऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

मिठी नदी धोक्याच्या पातळीवर

मुंबईतील मिठी नदीची पातळी धोकादायक मर्यादेपेक्षा जास्त झाली असून प्रशासनाला तातडीने ४०० ते ५०० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी सज्ज असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या काही तासांत नदीची पातळी किंचित कमी झाली असली तरी पुढील काही तासांत मुसळधार पाऊस झाला, तर धोका वाढू शकतो, अशी शक्यता फडणवीस यांनी व्यक्त केली.

रेड अलर्ट कायम

हवामान विभागाने मुंबईसह रायगड, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात सक्रिय असून, बंगालच्या उपसागरातही तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाची तीव्रता अधिक आहे. मुंबईसाठी रेड अलर्ट पुढील तीन तास कायम राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

लोकल सेवा विस्कळीत, वाहतूक कोंडी

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्ग ठप्प झाले आहेत. कल्याण, ठाणे, दादर आणि कुर्ला येथे रुळांवर पाणी साचले आहे. शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूकही कोंडीत अडकली असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सरकारची तयारी

“सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपत्ती निवारण दलांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. शेजारील राज्यांसोबत समन्वय साधून नद्यांमधील पाण्याचा विसर्ग नियंत्रित केला जात आहे. हिपरगी परिसरातून पाणी विसर्ग वाढवण्याची मागणी केली असून, त्यावर देखील लक्ष आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मृत आणि पीडितांना मदत

राज्यातील ग्रामीण भागात घरं व जनावरांच्या मृत्यूमुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत व शेतीच्या नुकसानीबाबत पंचनाम्यानंतर सहाय्य दिलं जाणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

नागरिकांना आवाहन

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “संध्याकाळची भरती आणि पुढील तीन तास पावसाचा जोर मुंबईसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं,” असं फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in