Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसात अडकली स्कुल बस; लहानग्यांना वाचवून मुंबई पोलीस बनले देवदूत | Video

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहराची पुन्हा एकदा दयनीय अवस्था केली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली. त्यातच माटुंगा पोलिस स्टेशनजवळ डॉन बॉस्को स्कूलची बस पाण्यात अडकली.
Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसात अडकली स्कुल बस; लहानग्यांना वाचवून मुंबई पोलीस बनले देवदूत | Video
Published on

सोमवारी (दि. १८) झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहराची पुन्हा एकदा दयनीय अवस्था केली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली. त्यातच माटुंगा पोलिस स्टेशनजवळ डॉन बॉस्को स्कूलची बस पाण्यात अडकली. बसमध्ये ६ लहान मुले, २ महिला कर्मचारी आणि बसचालक जवळपास तासभर अडकले होते. पाण्याने वेढलेल्या या बसपर्यंत पोहोचणे कठीण असताना माटुंगा पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत सर्वांना सुखरूप बाहेर काढत दिलासा दिला.

मुलांचा आधार बनले मुंबई पोलिस

घटनेची माहिती मिळताच, झोन ४ चे डीसीपी रागसुधा आर. यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पवार यांना तातडीने कळवले. रवींद्र पवार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. अखेर काही मिनिटांत सर्वांना सुरक्षितपणे माटुंगा पोलिस ठाण्यात सुखरूप आणण्यात आले. घाबरलेल्या मुलांना पोलिसांनी बिस्किटे देऊन सांत्वन केले. वेळेवर धावून आलेल्या कर्तव्यदक्ष पोलिसांचे नागरिकांनी तसेच मुलांच्या पालकांनी कौतुक केले.

मुंबईत वाहतूक कोंडी

मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच ईस्टर्न व वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. विलेपार्ले परिसरात रुग्णवाहिका दीर्घकाळ कोंडीत अडकल्याचे देखील समोर आले. मुंबईतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. प्रशासनाने शक्यतो अनावश्यक प्रवास टाळण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

आयएमडीचा इशारा कायम

दरम्यान, मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. १८ ऑगस्ट रोजी रायगड तर १९ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in