मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

मध्यपूर्वेतील तणावामुळे व्यावसायिक LPG सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग अडचणीत आला आहे. गॅस टंचाई कायम राहिल्यास काही दिवसांत शहरातील हॉटेल्स बंद ठेवावी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून उद्योग क्षेत्राकडून काळ्या बाजाराचीही भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती
मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर परिणाम होत आहे. गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत झाला नाही तर काही दिवसांत शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी दिला आहे.

रेस्टॉरंट्सना गॅस मिळण्यात अडचणी

इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टंचाई झपाट्याने वाढत आहे. "आजच्या घडीला आमच्या सुमारे १० ते २० टक्के सदस्यांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. उद्यापर्यंत हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत जाईल. त्यानंतरच्या दिवशी जवळपास १०० टक्के रेस्टॉरंट्सवर परिणाम होईल आणि त्यांना बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते,” असे शेट्टी यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्क

या समस्येबाबत असोसिएशनने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहिले असून महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे. गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यावसायिक सिलिंडर मिळणे कठीण

मुलुंडमधील ‘हॉटेल सागर’चे संचालक अन्नू शेट्टी यांनी सांगितले की, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. "काही ठिकाणी सिलिंडर उपलब्ध असले तरी १,७५० रुपयांचा सिलिंडर सुमारे १,९५० रुपयांना विकला जात आहे," असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. एका बुकिंगनंतर सिलिंडर मिळण्यासाठी दोन ते आठ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागत असल्याची माहिती डिलर्सनी दिली.

काळ्या बाजाराची शक्यता

ही टंचाई कायम राहिल्यास काही व्यावसायिक ग्राहक अनुदानित घरगुती सिलिंडर काळ्या बाजारातून खरेदी करण्याचा मार्ग स्वीकारू शकतात, अशी भीती उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या मते ही पद्धत बेकायदेशीर आणि धोकादायक आहे.

बंगळुरूतही बंदचा इशारा

एलपीजी पुरवठ्याचा हा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून बंगळुरूमध्येही हॉटेल असोसिएशनने हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर १० मार्चपासून हॉटेल्स बंद ठेवावी लागतील, असे असोसिएशनचे मानद अध्यक्ष पी. सी. राव यांनी सांगितले.

सरकारची उपाययोजना

दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी काही उपाययोजना केल्याचे सांगितले आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांना घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासोबतच अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नॉर्वे यांसारख्या देशांकडून एलपीजी आयातीचे पर्यायही शोधले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in