

मुंबई : मुंबईचा आयकॉनिक काळा घोडा कला महोत्सव शनिवार, ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून तो ८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर रंग, चैतन्य, सर्जनशीलता आणि सामूहिक उत्सवाची ऊर्जा पसरणार आहे. या कला महोत्सवात मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील कलाकार सहभागी होणार आहेत.
काळा घोडा फेस्टिव्हल कुठे?
हा महोत्सव मुंबईच्या ऐतिहासिक काला घोडा परिसरात आयोजित केला जातो. यात के. दुभाष मार्ग, सीएसएमव्हीएस संग्रहालय, क्रॉस मैदान, डेव्हिड ससून लायब्ररी, हॉर्निमन सर्कल गार्डन तसेच परिसरातील २५हून अधिक इनडोअर आणि आऊटडोअर ठिकाणांचा समावेश आहे. शनिवार, ३१ जानेवारी, २०२६ ते रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत महोत्सव आयोजित केला जाईल.
नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ‘सोबो’ (साऊथ बॉम्बे/दक्षिण मुंबई) मधील रस्ते आणि सार्वजनिक जागा सणासुदीच्या माहोलात न्हाऊन निघतील. सादरीकरणे पारंपरिक रंगमंचांमधून बाहेर पडून शहराच्या जागांमध्ये साकारली जातील. मेट्रो स्थानकांवर कलाकृती, सार्वजनिक ठिकाणी कलाकारांची उपस्थिती, ऐतिहासिक वास्तूंमध्ये घुमणाऱ्या चर्चा व साहित्यसंवाद, नाट्य व नृत्य सादरीकरणांनंतर प्रेक्षकांचा जल्लोष, उत्साही खाद्यसंस्कृती आणि कार्यशाळा या सगळ्यांतून मुंबईची बहुसांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसून येईल.
संकल्पना 'अहेड ऑफ द कर्व्ह'
यंदाच्या आवृत्तीची संकल्पना 'अहेड ऑफ द कर्व्ह' असून त्यातून दूरदृष्टी, नवकल्पना आणि अनुकरण न करता मार्गदर्शन करण्याचे धाडस यांचा उत्सव साजरा करते. काळा घोडा असोसिएशनच्या अध्यक्षा आणि महोत्सव संचालक ब्रिंदा मिलर यांच्या मते, ही संकल्पना बदलांचा अंदाज घेणे आणि कलात्मक अभिव्यक्तीत आघाडीवर राहणे हे या महोत्सवाचे तत्त्वज्ञान आहे.
फ्री पास कसा मिळवाल?
काळा घोडा फेस्टिव्हल सर्वांसाठी मोफत आहे, पण काउंटरवर नोंदणी करणे आवश्यक आहे. काउंटरवर जाणे शक्य नसल्यास https://kalaghodaassociation.com/ या अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'मोफत नोंदणी' लिंकवर क्लिक करा, त्यानंतर तिकीट बूकिंगच्या पर्यायावर क्लिक करून सोयीस्कर तारीख निवडा.