

मुंबईतील काळाचौकी परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३ महिन्यात पाच जणांनी मिळून वारंवार सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यात एका २५ वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली असून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
PTI ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. आरोपींनी मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार करून तिला धमक्या दिल्या आणि ब्लॅकमेल करून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला.
ही घटना रविवारी (१० ऑगस्ट) उघडकीस आली. पीडित मुलीने सततच्या अत्याचाराला कंटाळून अखेर आपल्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे.
