१६० फेरीवाल्यांचे बस्तान उठवले; कांदिवली फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा; आकुर्ली रोड, डॉ. दळवी रोड अतिक्रमणमुक्त

पादचारी अभियानांतर्गत कांदिवली पूर्वेकडील आकुर्ली रोड, व पश्चिमेकडील डॉ. दळवी रोड, प्रविण संघवी रोडवरील बेकायदा बांधकामे, १६० बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, तर फुटपाथवरील अडथळा दूर करण्यासाठी ४२ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे.
१६० फेरीवाल्यांचे बस्तान उठवले; कांदिवली फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा; आकुर्ली रोड, डॉ. दळवी रोड अतिक्रमणमुक्त
Published on

मुंबई : पादचारी अभियानांतर्गत कांदिवली पूर्वेकडील आकुर्ली रोड, व पश्चिमेकडील डॉ. दळवी रोड, प्रविण संघवी रोडवरील बेकायदा बांधकामे, १६० बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, तर फुटपाथवरील अडथळा दूर करण्यासाठी ४२ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार पादचारी प्रथम अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार, आर दक्षिण विभागात पादचारी प्रथम अभियानांतर्गत कांदिवली पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

परिमंडळ ७ चे उपायुक्त मनीष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आरती गोळेकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही मोहीम राबविण्यात येत आहे.‌ ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इथे झाली कारवाई

या मोहिमेत कांदिवली पूर्वेतील आकुर्ली रोड (रेल्वे स्थानक ते पश्चिम द्रुतगती महामार्ग) तसेच कांदिवली पश्चिमेतील स्वामी विवेकानंद मार्ग, डॉ. दळवी रोड, वासनजी लालजी रोड, बजाज रोड, प्रविण संघवी रोड आणि न्यू लिंक रोड या प्रमुख मार्गांवरील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यात आले.

महापालिकेने ६ ऑगस्ट २०२५ पासून ही मोहीम सुरू केली असून रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि मोकळे करण्यावर भर देण्यात येत आहे.

४२ इमारतींना नोटिसा

कारवाईदरम्यान पदपथांवर अडथळा निर्माण करणारे अनधिकृत फेरीवाले हटविण्यात आले. तसेच पदपथावर उतार (रॅम्प) तयार करून पादचाऱ्यांच्या हालचालींना अडथळा ठरणाऱ्या ४२ आस्थापना व इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

याशिवाय पदपथांवर उभारण्यात आलेल्या सात अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यात आले असून संबंधित ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवून पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in