Mumbai : ‘केईएम’मधील औषधांचा तुटवडा दूर करणार; पालिका अधिकाऱ्यांची ग्वाही

केईएम रुग्णालयातील औषधांचा दोन वर्षांचा तुटवडा दूर केला जाईल, तीन एलिव्हेटर चालू करण्यात येतील, रजिस्ट्रेशनसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवीन १० रजिस्टर केंद्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, १२५ स्पेशल ब्लड टेस्ट्स येथेच करून घेतल्या जातील, तसेच MRI चाचणीचा दर हा बाहेर पाठवल्यास पालिका दरानेच करून घेतला जाईल. याशिवाय, कूपर रुग्णालयात पुढील आठवड्याभरात पूर्णवेळ वैद्यकीय अधिष्ठाता दिला जाईल.
Mumbai : ‘केईएम’मधील औषधांचा तुटवडा दूर करणार; पालिका अधिकाऱ्यांची ग्वाही
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : केईएम रुग्णालयातील औषधांचा दोन वर्षांचा तुटवडा दूर केला जाईल, तीन एलिव्हेटर चालू करण्यात येतील, रजिस्ट्रेशनसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवीन दहा रजिस्टर केंद्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, १२५ स्पेशल रक्त चाचण्या येथेच करून घेतल्या जातील, तसेच एमआरआय चाचणीचा दर हा बाहेर पाठवल्यास पालिका दरानेच करून घेतला जाईल. कूपर रुग्णालयात पुढील आठवड्याभरात पूर्णवेळ वैद्यकीय अधिष्ठाता दिला जाईल, अशी ग्वाही पालिका अधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती भाजप आमदार अमित साटम यांनी दिली.

केईएम रुग्णालयात होत असलेली नागरिकांची गैरसोय आणि खासगी सेंटरमध्ये चाचण्यांमुळे रुग्णांची होणारी लूट पाहून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तीव्र संताप व्यक्त करत डीन डॉ. संगीता रावत यांना जाब विचारला होता. यासंदर्भात मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रुग्णांच्या अनेक तक्रारींचा विचार करण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय संचालक डॉ. नीलम अंद्राडे, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत उपस्थित होते.

बैठकीत केईएम रुग्णालयातील अनेक तक्रारींवर चर्चा करण्यात आली. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार, रुग्णालयात सिलिंग, डक्ट इत्यादींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, तसेच सर्व ड्रेनेज पाईप्सना उंदीर रक्षक पत्रे लावले जातील. रुग्णालयातील अन्न वाया जाऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार अमित साटम यांनी दिली.

लोढा, साटम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

बैठकीत औषधांच्या टंचाईबाबतही चर्चा करण्यात आली. यावर मंत्री लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष साटम यांनी अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले. या चर्चेदरम्यान पुढील दोन वर्षे आवश्यक औषधांचा साठा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर स्टॉक करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

logo
marathi.freepressjournal.in