Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO

मुंबईतील प्रभादेवी परिसरात ‘केजी मार्गचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत होंडा सिटी कार घुसल्याने ४ भाविक जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने कारची तोडफोड केली. गाडीवरील ‘अ‍ॅडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट’ स्टिकरनेही लक्ष वेधले.
Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO
Published on: 

मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह सुरू असतानाच प्रभादेवी परिसरात शुक्रवारी (दि.२५) धक्कादायक घटना घडली. ‘केजी मार्गचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत अचानक होंडा सिटी कार घुसल्याने ४ भाविक जखमी झाले. काकासाहेब गाडगीळ मार्गावरील इंद्रा टॉवरजवळ ही घटना घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने कारची तोडफोड केली. विशेष म्हणजे, या कारवर ‘अ‍ॅडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट’ असे स्टिकर असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मिरवणुकीत अचानक घुसली कार

‘केजी मार्गचा राजा’ची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू होती. भाविकांची मोठी गर्दी असतानाच होंडा सिटी कार मिरवणुकीत घुसली आणि ४ जणांना धडक बसली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला.

या घटनेत जखमी झालेल्या चौघांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यापैकी दोघांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आले, तर अन्य दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

संतप्त जमावाकडून कारची तोडफोड

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये नुकसान झालेल्या कारवर 'अ‍ॅडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट' असे स्टिकर स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, कारचालक वकील आहे का किंवा या स्टिकरचा त्याच्याशी नेमका काय संबंध आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२१ वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी २१ वर्षीय कारचालक प्रणव राकेश अग्रवाल याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते का, हे तपासण्यासाठी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले.

जखमींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in