

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत येणाऱ्या १० ते १२ विषयांपैकी तब्बल ९ ते १० विषय चुकीच्या पद्धतीने आणले जात असल्याचा आरोप करत पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेची मालमत्ता खासगी संस्थांना आंदण देण्याचा घाट घातला जात असून राज्य सरकारच्या अखत्यारितील आरे रुग्णालयाचा आर्थिक भार मुंबई महापालिकेवर लादला जात आहे. सत्ताधारी पक्षाने मुंबईला विकायला काढले आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करत निधी वाढवण्याऐवजी महापालिकेची लूट सुरू असल्याचा गंभीर किशोरी पेडणेकर यांनी केला. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या सुधार समितीच्या बैठकीत विविध प्रस्तावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
आरे येथील रुग्णालयाची १ हजार ९३२.२० चौरस मीटर जागा ३० वर्षांसाठी विनामोबदला राज्य सरकारने मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर पेडणेकर यांनी आक्षेप घेतला. मुंबई महापालिकेच्या हद्दीत जागा असल्याने राज्य सरकार ती महापालिकेकडे सोपवत आहे; मात्र त्यानंतर या जागेचा आर्थिक भार आणि देखभालीची जबाबदारी महापालिकेवरच टाकली जात असल्याचे त्या म्हणाल्या. आरे परिसरातील २७ आदिवासी पाड्यांची जबाबदारीही महापालिकेवर बंधनकारक करण्यात आली आहे.