

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो गणेशभक्तांना उत्सवाच्या काळात वाटप करण्यात आलेल्या प्रसादातून निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्याचे यंदा थेट ऊर्जेत रूपांतर करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत निर्माण झालेला सुमारे ४२ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. त्यातील ओला व अन्नकचरा महापालिकेच्या जैववायू निर्मिती प्रकल्पांमध्ये प्रक्रिया करून त्यातून जैववायू आणि वीज तयार केली जात आहे.
यंदा प्रथमच महापालिकेने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने ‘प्रसाद टू पॉवर’ हा उपक्रम राबविला. लालबाग परिसरातून ओला कचरा थेट कांजूरमार्ग येथील प्रक्रिया केंद्रावर नेण्याऐवजी जवळच्या सेव्हरी क्षयरोग रुग्णालयातील जैववायू निर्मिती प्रकल्पात प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कचरा वाहतुकीवरील वेळ आणि खर्चाची बचत झाली.
कचरा संकलनासाठी ४५ फेऱ्या
सेव्हरी टीबी रुग्णालयातील दररोज दोन मेट्रिक टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्रकल्प २०२४ पासून कार्यरत आहे. लालबागच्या राजाच्या उत्सवातून निर्माण झालेला ओला कचरा या प्रकल्पात टप्प्याटप्प्याने प्रक्रिया करण्यात येत आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत कचरा संकलनासाठी तब्बल ४५ फेऱ्या करण्यात आल्या. दररोज सरासरी तीन फेऱ्यांमधून ओला कचरा मंडपातून उचलण्यात आला.
वीज पोहोचवण्याची व्यवस्था
या प्रक्रियेतून सुमारे ३,६४५ घनमीटर जैववायू निर्माण होणार असून त्याचा वापर शिवडी टीबी रुग्णालयात करण्यात येणार आहे तसेच सुमारे ४,३८२ युनिट वीज निर्मिती अपेक्षित असून ही वीज रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ साठी वापरण्यात येणार आहे. या वॉर्डमध्ये सध्या सुमारे ९० रुग्ण उपचार घेत आहेत. निर्माण झालेली वीज वॉर्डपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
कचरा बायोमिथेनेशन प्रकल्पांकडे पाठवला
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा उपक्रम आधीच नियोजित करण्यात आला होता. मंडळाच्या प्रसाद कक्ष आणि अन्नछत्रातून निर्माण होणारा ओला कचरा व अन्नकचरा स्वतंत्रपणे गोळा करून पालिकेच्या रुग्णालयांमधील बायोमिथेनेशन प्रकल्पांकडे पाठवण्यात आला.
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया
शिवडी प्रकल्पाची दररोज दोन टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असल्याने त्यापेक्षा जास्त कचरा सायन रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि नायर रुग्णालयातील जैववायू निर्मिती प्रकल्पांकडेही पाठविण्यात आला. या प्रकल्पांमध्ये अन्य दिवशी संबंधित परिसरातील हॉटेलमधून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.