मुंबई लोकल ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालून स्टंट करतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हार्नेसच्या मदतीने स्वतःला लोकल ट्रेनच्या दरवाजाला बांधून, चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकताना दिसत आहे.
हा व्हिडीओ ३१ डिसेंबरला ‘मुंबई खबर’ (Mumbai Khabar) या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला होता. यावर रेल्वे सेवा (Railway Seva) यांनीही प्रतिक्रिया देत प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले.
लोकमत टाइम्सच्या वृत्तानुसार, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) या धोकादायक स्टंटप्रकरणी संबंधित तरुणाला अटक केली आहे. ३१ डिसेंबरला तक्रार दाखल झाल्यावर आरपीएफने रेल्वे कायद्याच्या कलम १५४ आणि १४५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर मस्जिद बंदर परिसरातील त्याच्या घराजवळ छापा टाकून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव बाबुल असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. चौकशीत त्याने स्टंट केल्याची कबुली दिली. हा प्रकार डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाजवळ केल्याचेही त्याने सांगितले.
दरम्यान, भविष्यात असे धोकादायक कृत्य पुन्हा करणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर आरोपीला नोटीसवर सोडण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. याआधी १३ डिसेंबरला सीवूड्स ट्रॅफिक पोलिसांनी पाम बीच रोडवरील एका धोकादायक स्टंटप्रकरणी दखल घेतली होती. चालत्या कारच्या छतावर बसून स्टंट करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे ही कारवाई करण्यात आली होती.